मोतीतलाव गणपती विसर्जन कुंड काम पुर्ण करण्याअगोदरच गुत्तेदाराला १९ कोटी दिले! - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, May 5, 2026

मोतीतलाव गणपती विसर्जन कुंड काम पुर्ण करण्याअगोदरच गुत्तेदाराला १९ कोटी दिले!

 

कुंडाच्या अर्धवट व निकृष्ठ कामाची चौकशी करून गुन्हा दाखल करावा- विकासकुमार बागडी*


जालना/दिनांक ६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) 

मोठा गाजावाजा करून, जालना शहरात मोतीबाग गणपती विसर्जन कुंडाचे काम करण्यात आले. या कामात गुत्तेदाराला काम करण्याअगोदर १९ कोटीचा निधी देण्यात आला. यासाठी तत्कालिन मनपाच्या अधिकाऱ्यांसह लेखाधिकारी, बांधकाम अभियंता यांनी संगणमत करून, मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याचे प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणात  नवीन आयुक्त श्रीमती शर्मा यांनी लक्ष घालून, अर्धवट विसर्जन कुंडाची चौकशी करून, संबंधीत गुत्तेदारासह त्यास मदत करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी जालना समाचारचे संपादक विकासकुमार बागडी यांनी केली आहे.

जालना शहरातील मोती तलाव येथील गणपती विसर्जन कुंडाच्या नावाखाली १९ कोटी रूपये उचलण्यात आलेली आहे..परंतु प्रत्यक्षात केलेले काम अत्यंत निकृष्ट (थर्ड क्लास) दर्जाचे असून, वापरण्यात आलेले साहित्यही अत्यंत कमी दर्जाचे आहे. सदर कुंडाचा उपयोग वर्षातून केवळ दोन वेळाच (गणपती विसर्जन व नवरात्र विसर्जन) केला जातो, तरीही इतक्या मोठ्या निधीचा वापर करूनही हा कुंड प्रत्यक्ष वापरासाठी अयोग्य ठरत आहे. कुंडामध्ये पाणी साठत नाही व उलट तलावाचे पाणी आत येते, यावरून कामाची निकृष्ट गुणवत्ता स्पष्ट होते.सदर कामामध्ये मंजूर अंदाजपत्रकाचे पालन करण्यात आलेले नसून, संबंधित अभियंत्यांनी प्रत्यक्ष कामापेक्षा जास्त बिल तयार करून आर्थिक गैरव्यवहार केला आहे. तसेच, लेखा विभागाने कोणतीही प्रत्यक्ष पाहणी किंवा तपासणी न करता बिल मंजूर करून या गैरव्यवहारात सहभाग घेतला आहे.म्हणून या प्रकरणात संबंधित अभियंते व लेखा विभाग यांना थेट जबाबदार धरून त्यांच्यावर पोलीस तक्रार नोंदविण्यात यावी.तसेच, या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र (बाह्य) विभागामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, ही नम्र पण ठाम मागणी आहे.

मोती तलाव गणपती विसर्जन कुंडाच्या कामाची बाह्य यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, संबंधित अभियंते व लेखा विभागातील अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हा   नोंदविण्यात यावा, निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाई करण्यात यावी., सदर कामाची तांत्रिक तपासणी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. जर वरील मागण्यांवर तात्काळ कारवाई करण्यात आली नाही, तर मी बाध्य होऊन आंदोलनाचा मार्ग स्वीकारून उपोषणास बसणार आहे, याची कृपया गंभीर नोंद घ्यावी.आपण या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी,   अशी मागणीही विकास कुमार बागडी यांनी केली आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages