यंदा मुलींसाठी राखीव असणार स्वतंत्र पाचवी फेरी
दि. २३ :-
या वर्षापासून (२०२६) अकरावी प्रवेश प्रक्रियेत मुलींना अतिरिक्त संधी देण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. तीन नियमित फेऱ्या आणि 'ओपन टू ऑल' फेरीनंतर मुलींसाठी स्वतंत्र पाचवी विशेष फेरी राबवली जाणार आहे.
केंद्रीकृत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे (CAP) वेळापत्रक खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आले आहे:
२० मे रोजी रिक्त जागा आणि पहिल्या फेरीसाठी कोटा अंतर्गत (Management, In-House, Minority) जागा प्रदर्शित करण्यात आल्या.
पहिली नियमित फेरी:
२१ मे (सकाळी ८:००) ते २२ मे (सायंकाळी ६:००) पर्यंत नवीन नोंदणी, भाग-१ आणि भाग-२ (कॉलेज पसंतीक्रम) भरण्याची मुदत होती.
२३ ते २५ मे दरम्यान डेटा प्रोसेसिंग आणि सीट अलॉटमेंट होईल.
२६ मे रोजी पहिली गुणवत्ता यादी (Merit List) जाहीर होईल.
२६ ते २८ मे दरम्यान विद्यार्थ्यांना मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावा लागेल.
२९ मे रोजी पहिल्या फेरीनंतरच्या रिक्त जागा पोर्टलवर जाहीर होतील.
दुसरी नियमित फेरी: ३० मे रोजी दुसऱ्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पोर्टलवर अधिकृतपणे प्रसिद्ध केले जाईल.
विद्यार्थ्यांना अर्जामध्ये (भाग-२ फॉर्म) किमान १ आणि कमाल १० कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम निवडणे बंधनकारक आहे.
विद्यार्थ्यांचे गुण (सर्वोत्तम ५ विषय) आणि आरक्षण यानुसार संबंधित महाविद्यालयात प्रवेश मिळतो.
पहिल्या फेरीत पसंतीचे कॉलेज न मिळाल्यास, विद्यार्थी पुढील फेऱ्यांमध्ये आपले पर्याय बदलून प्रयत्न करू शकतात.
दहावी पास मुलींचा टक्का वाढला
फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये झालेल्या दहावीच्या (SSC) परीक्षेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलांच्या तुलनेत मुलींचा टक्का अधिक असल्याने, कट-ऑफ वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन शासनाने ही विशेष पाचवी फेरी सुरू केली आहे जेणेकरून मुलींना त्यांच्या आवडीचे कॉलेज मिळू शकेल.
अकरावी प्रवेशाची संपूर्ण प्रक्रिया Maha FYJC Admission Portal या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने पार पडत आहे. विद्यार्थ्यांचे कागदपत्र पडताळणी देखील ऑनलाईन होणार असून नवीन शैक्षणिक वर्ष १५ जुलैपासून सुरू करण्याचे नियोजन आहे.