महसूल अधिकाऱ्यांनी ग्राम स्तरावरील महसूली कामकाजांची तपासणी करा -अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, May 22, 2026

महसूल अधिकाऱ्यांनी ग्राम स्तरावरील महसूली कामकाजांची तपासणी करा -अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे


* अमरावती विभागाचा महसूली कामकाजांचा घेतला आढावा

 * महाराजस्व अभियान प्रभावीपणे राबवा


* आरटीएस अंतर्गत अधिसूचित सेवा प्राधान्याने पुरवा


 

अमरावती, दि. २३ : राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी प्रत्येक महसूल अधिकाऱ्यांनी आठवड्यातून एक दिवस ग्राम स्तरावरील महसूल यंत्रणांना तसेच प्रत्यक्ष कार्यस्थळी भेट देऊन अनुषंगीक सर्व बाबींची तपासणी करावी. तपासणीअंती लक्षात आलेल्या अडचणी किंवा उणीवांची कारणमीमांसा जाणून धोरणात्मक बाबी संदर्भात शासनाला कळवावे, असे निर्देश अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांनी संबधित जिल्हा प्रशासनाला दिले.

श्री. खारगे यांनी आज अमरावती जिल्हा दौरा दरम्यान जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार  कार्यालय, तलाठी कार्यालय, सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी, भूमी अभिलेख आदी कार्यालयांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील कामकाज, दस्तऐवज, ई-ऑफीस प्रणालीची तपासणी केली. त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत श्री. खारगे यांनी अमरावती विभागाचा महसूल कामकाजांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त नयना गुंडे, अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर, अपर आयुक्त संजय जाधव, सुरज वाघमारे, नगरविकास प्रशासनाच्या उपायुक्त माधुरी कडू प्रत्यक्षरित्या तसेच यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना, वाशिमचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, अकोल्याच्या जिल्हाधिकारी वर्षा मीना, बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे आदी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठकीला उपस्थित होते.

श्री. खारगे म्हणाले की, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत महसूल विभागाच्या अधिसूचित सेवा नागरिकांना प्राधान्याने पुरविल्या जाणार याची दक्षता घ्यावी. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्रांना भेट देऊन नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा, दाखले विहित वेळेत दिले जातात किंवा कसे याबाबत तपासणी करावी. भुसंपादन कायदा अंतर्गत सार्वजनिक प्रकल्पांसाठी जमीन संपादित करताना जमीन मालकांना योग्य मोबदला आणि त्यांचे पुनर्वसन योग्यरितीने झाल्याचे खातरजमा करावी. तसेच यातून प्राप्त होणाऱ्या महसूलातून जिल्ह्यातील महत्वाचे प्रकल्प, उपक्रम पूर्ण करावे. जिल्ह्याच्या महसूल गोळा करण्याच्या लक्षांक पूर्ततेसाठी जबाबदारीपूर्वक कार्य करावे, असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, महसूल, भुमी अभिलेख व नोंदणी-मुद्रांक विभाग ही प्रशासनाची महत्वाची खाते असून जमीन व्यवहाराशी निगडीत सर्व कामे या विभागाव्दारे केली जातात. या विभागाव्दारे पुरविण्यात येणाऱ्या अधिसूचित सेवा सामान्य नागरिकांना सहज व सुलभरित्या उपलब्ध होतील, यादृष्टीने संबंधित विभागांनी एकत्र येवून कार्य करावे. संबंधित जिल्हाधिकारी यांनी संयुक्त तपासणी दौरा करुन राज्य शासनाच्या योजना, उपक्रम, मोहिम यशस्वीरित्या राबवाव्यात. जिल्ह्यात महाराजस्व समाधान शिबिरांचे उत्तमरित्या आयोजन करुन गरजूंना आवश्यक कागदपत्रे, दाखले, 7/12 उतारा आदी उपलब्ध करुन द्यावेत. समाजातील गोर-गरीब नागरिकांच्या क्षेत्रीय स्तरावरील अडचणी व समस्यां जाणून  त्यांच्या सोयी-सुविधांसाठी जे-जे चांगले करता येईल, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे, असे आवाहन श्री. खारगे यांनी यावेळी केले.

यावेळी बैठकीत अपर आयुक्त श्री. जाधव यांनी अमरावती विभागाची संक्षिप्‍त माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून अपर मुख्य सचिवांना दिली. अमरावती विभगातील सिलींग जमीन, भूदान जमीन, कुळकायदाच्या जमीनी अधिकृतपणे भोगवटदार वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये रुपांतरीत करणे, देवस्थान इनाम जमीनी, आदिवासी जमीनी, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान, वनक्षेत्राच्या महसूली अभिलेख, गाव नमुना, 7/12 मधील भोगवटदार सदरी वनक्षेत्राच्या  नोंदी, फेरफार निर्गती, ॲग्रीस्टॅक नोंदणी, शासकीय जमीनीवरील निवासी प्रयोजनासाठीची अतिक्रमणे नियमानुकूल करणे, वाळू धोरण व वाळूघाट लिलाव, मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना, अर्धन्यायीक, विभागीय चौकशी प्रकरणे, पाणी टंचाई कृती आराखडा, आपले सरकार पोर्टल आदी महत्वाच्या विषयांबाबत अमरावती विभागाचा सविस्तर आढावा श्री. खारगे यांनी यावेळी घेतला.

 

00000

--

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages