अमरावती, दि. २७ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : मतदारयाद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2026 अंतर्गत अमरावती विधानसभा मतदारसंघात पूर्वतयारी सुरू आहेत. या अंतर्गत नागरिकांची 2002 मधील मतदारयादी आणि सध्याची मतदार यादी यांची आपापसात मॅपिंग करण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी संबंधित बीएलओंना भेटून मॅपिंगची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
38 - अमरावती विधानसभा मतदारसंघात अद्यापही 24 टक्के मतदारांचे मॅपिंग होणे बाकी आहे. त्यामुळे ज्या मतदारांचे मॅपिंग झालेले नाही, त्यांनी तातडीने आपल्या भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. ज्या मतदारांचे बीएलओंकडून मॅपिंग पूर्ण झाले आहे, त्यांची 'एसआयआर' प्रक्रिया अत्यंत सोप्या आणि सुरळीत पद्धतीने पार पडणार आहे. मात्र, ज्यांचे मॅपिंग झालेले नसेल, अशा मतदारांना या प्रक्रियेदरम्यान त्यांच्या जन्मतारखेच्या पुराव्यासाठी वेगवेगळी कागदपत्रे सादर करावी लागतील. हा त्रास टाळण्यासाठी मतदारांनी स्वतःहून पुढाकार घेणे गरजेचे आहे.
अनेक मतदारांची नावे मतदारयादीत दोन ठिकाणी असण्याची शक्यता असते. अशा मतदारांनी सध्या ते जेथे वास्तव्यास आहेत किंवा ज्या ठिकाणी त्यांना मतदानाचा हक्क हवा आहे, तेथील नाव कायम ठेवावे. तर दुसऱ्या ठिकाणचे नाव कमी करण्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी किंवा संबंधित बीएलओंकडे 'नमुना अर्ज क्र. 7' सादर करावा, अशी सूचनाही देण्यात आली आहे.
मतदान प्रक्रियेत सुलभता आणि अचूकता आणण्यासाठी नागरिकांनी आपल्या बीएलओंची भेट घेऊन मॅपिंग प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच दुबार नावांच्या सुधारणेसाठी सहकार्य करावे असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अनिल भटकर आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार विजय लोखंडे यांनी केले आहे.