जिल्हा पोलिस दलाला आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, April 19, 2026

जिल्हा पोलिस दलाला आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण




*47 आपत्ती प्रतिसाद किटचे वाटप

अमरावती, दि. २० (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात उद्भवणाऱ्या आपत्तीला तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी आणि जिल्हा शोध व बचाव पथक घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी होणारी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष पुढाकार घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी श्री. आशिष येरेकर यांच्या निर्देशानुसार, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून जिल्ह्यासाठी 'आपत्ती प्रतिसाद किट' उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या उपक्रमांतर्गत ग्रामीण आणि शहर पोलीस दलाला 47 आपत्ती प्रतिसाद किट वाटप करण्यात आली आहे. या संदर्भात गुरूवार, दि. 16 एप्रिल रोजी पोलिस कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिर पार पडले. निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे अध्यक्षस्थानी होते.

पोलिस कर्मचाऱ्यांना आपत्ती काळात अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. यात आपत्ती व्यवस्थापन किट हाताळणे, मोठी व मध्यम आकाराचे स्ट्रेचर, लाईफ जॅकेट, हॅडग्लोज, गमबूट, सेप्टी नेट, 30 मीटर रॅपलिंग रोप आणि किट स्टोरेज बॉक्सचा वापर करण्याबाबत प्रात्यक्षिक देण्यात आले. तसेच वैद्यकीय प्रथमोपचार सीपीआर, आपत्तीमध्ये जखमींना उचलण्याच्या पद्धती आणि प्राथमिक उपचार, यासह विविध आपत्तींचा सामना, पूर, आग, वीज कोसळणे, भूकंप आणि उष्माघातासारख्या परिस्थितीत घ्यावयाची काळजी व कार्यवाहीबाबत माहिती देण्यात आली. या नाविन्यपूर्ण प्रशिक्षणामुळे जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम होईल, असा विश्वास निवासी उपजिल्हाधिकारी श्री. काकडे यांनी व्यक्त केला.

सदर प्रशिक्षणात मार्गदर्शक म्हणून क्रिएटिव न्यू टेक लिमीटेडचे प्रा. डॉ. विलास बैले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर, आपत्ती व्यवस्थापन तज्‍ज्ञ अनुराग पचौरी, सहायक पोलीस उपनिरीक्षक मोहन भारसाकडे, श्री. कढाणे आणि संतोष कविठकर उपस्थित होते. सुरेंद्र रामेकर यांनी प्रास्ताविक केले, सचिन धरमकर, विशाल निमकर, आकाश निमकर, कौस्तुभ वैद्य आणि सुमीत बांबल यांनी प्रशिक्षणासाठी सहकार्य केले.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages