ग्राहकांनी गॅस सिलिंडरसाठी आगाऊ बुकींग करू नये - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, March 13, 2026

ग्राहकांनी गॅस सिलिंडरसाठी आगाऊ बुकींग करू नये

 




जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन

*घरपोच सेवा देण्यासाठी यंत्रणा राबविणार

अमरावती, दि. १४(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. मध्यतंरीच्या काळात फोनद्वारे होणाऱ्या बुकींगसाठी वेळ लागत असल्याने ग्राहकांमध्ये घबराहट निर्माण झाली. परिणामी ग्राहकांनी आवश्यकता नसताना खबरदारी म्हणून गॅस बुकींग सुरू केले. यामुळे वितरणावर परिणाम होत असल्याने ग्राहकांनी गॅस सिलिंडरसाठी आगाऊ बुकींग करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील घरगुती गॅस  सिलिंडरच्या वितरणाबद्दल वितरकांची बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे यांच्यासह शहरातील गॅस वितरक उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी वितरकांकडून सद्यस्थितीची माहिती घेतली. वितरकांनी ग्राहकांसाठी ॲप, तसचे फोनद्वारे बुकींगची सुविधा आहे. मात्र फोनद्वारे गॅस बुकींग करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. या यंत्रणेमध्ये दुरूस्ती सुरू आहे. परिणामी ग्राहकांना बुकींग करताना वेळ लागत आहे. तसेच मध्यपूर्व भागातील युद्धामुळे घबराटीचे वातावरण असल्यामुळे ग्राहक आगाऊ गॅस बुकींग करीत आहे. बुकींग जादा झाल्यामुळे वितरणाला वेळ लागत आहे. त्यामुळे ग्राहकांनी अशाप्रकारची बुकींग टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. बुकींगनंतर ग्राहकांना घरपोच  सिलिंडर देण्यात येत असल्याचे सांगितले.

शासनाने व्यावसायिक गॅस पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे वितरकांनी घरगुती सिलिंडर वितरणावर लक्ष केंद्रीत करावे. गॅस कंपन्यांनी वितरणाची सशक्त यंत्रणा उभारली असली तरी बुकींग केलेल्याच ग्राहकांना सिलिंडरचे वितरण करण्यात यावे. तसेच एजंसीसमोर सिलिंडरच्या रांगा लागत असल्याने ग्राहकांना घरपोच  सिलिंडरचे वितरण करण्यात यावे. देशात जीवनावश्यक वस्तू कायदा लागू करण्यात आला आहे. त्यामुळे वितरकांनी याबाबत काळजी घ्यावी. सध्यास्थितीमध्ये आश्रमशाळा, रूग्णालय, वसतिगृहे यांना सुरळीत गॅस पुरवठा करण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी.

गॅस एजंसीधारकांसमोर ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या ग्राहकांना सौजन्यपूर्वक वागणूक द्यावी. जिल्हा प्रशासन निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यास सक्षम आहे. एजंसीच्या ठिकाणी आवश्यकता भासल्यास पोलिस संरक्षणाची मागणी करावी. तसेच शहराच्या लगत ग्रामीण भागात मागणीनुसार पुरवठा सुरळीत ठेवण्यात यावा. घरगुती  सिलिंडरचा वापर व्यावसायिक कारणासाठी होत असल्यास त्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी सांगितले.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages