Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

"स्मार्ट सिटीचे स्वप्न...पण शेतकऱ्यांची वाट अजूनही खड्ड्यांत"




शिरजगाव कसबा परिसरातील पांदण रस्त्यांची दयनीय अवस्था; शेतकरी त्रस्त 

लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज 

शिरजगाव कसबा, दिनांक १४  अक्षय गुजर  (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

भारत हा कृषिप्रधान देश मानला जातो; मात्र शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी आजही पक्के रस्ते नसल्याचे चित्र चांदूर बाजार तालुक्यातील शिरसगाव कसबा महसूल मंडळात पाहायला मिळत आहे.पांदण रस्त्यांपैकी अशोक गुर्जर ते सतीश पाटील,सतीश पाटील ते पाळा आणि शिरसगाव ते खळल्यावरून पाळा व इतर अन्य पांदण रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून शेतकऱ्यांना अक्षरशः खड्ड्यातून अन पावसाळ्यात चिखलातून वाट काढावी लागते.काही ठिकाणी रस्ते अरुंद तर कुठे खड्डे पडल्याने सायकल,दुचाकी चालवणेही कठीण झाले.

मागील काळात सा.बां. विभागाकडून काही पांदण रस्त्यांचे रुंदीकरण व मुरुमीकरण करण्यात आले होते.मात्र अनेक रस्ते अद्याप अपूर्ण राहिले असून पावसाळा जवळ येत असताना शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

दरम्यान, तीन महिन्यांनंतर सुरू होणाऱ्या पावसाळ्यात परिस्थिती अधिक बिकट होते. विशेषतः या भागातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात संत्रा काढणीचा हंगाम सुरू असताना रस्ते चिखलमय असल्याने माल बाजारपेठेत नेणे कठीण होते.परिणामी वेळेवर तोडणी न झाल्याने संत्रा झाडावरून खाली पडतो आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते.

 मातीकरण झालेल्या रस्त्यांचे पक्के मुरुमीकरण कधी? 

२०२१-२२,२०२२-२३ या कालावधीत काही पांदण रस्त्यांचे रुंदीकरण करून मातीकरण झाले होते.शेतकऱ्यांना दिलासा तर मिळालाच मात्र पावसाळ्यात हेच रस्ते पुन्हा खड्डेमय होत असल्याने कायमस्वरूपी उपाय म्हणून मुरुमीकरण-खडीकरण करण्याची मागणी होत आहे.

विधानसभेत चर्चा होऊनही कामात विलंब का? 

पांदण रस्त्यांच्या दुरवस्थेचा मुद्दा विधानसभेतही उपस्थित करण्यात आला होता.त्यावेळी शेतरस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली.तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पांदण रस्ते दुरुस्तीसाठी कामे करण्यात येतील, असे आश्वासन दिले होते.मात्र प्रत्यक्षात अनेक रस्त्यांच्या कामांना अद्याप गती मिळालेली नसल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत.

प्रतिक्रिया 

सर्व पांदण रस्त्यांना मुख्यमंत्री बळीराजा योजनेत समाविष्ट करण्यासाठी मागील आठवड्यात तहसील कार्यालयाला पत्र दिले आहेत.

 निलेश चौधरी 

 उपअभियंता,सा.बां. उपविभाग,चांदुर बाजार 

सदर रस्ते मुख्यमंत्री बळीराजा पांदण रस्ते योजनेत समाविष्ट करण्यात येतील.

मनोज सोनारकर 

 तहसीलदार, चांदुर बाजार

कच्च्या रस्त्यावरून शेतमाल काढताना अडचणी येतात.गेल्या अनेक वर्षांपासून पांदणच्या समस्या प्रलंबित आहे.शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास शासन-प्रशासन जबाबदार राहतील.

पवन सातपुते, शेतकरी, शि. कसबा



Post a Comment

0 Comments