चमत्कार प्रशिक्षणातून विद्यार्थी व महिलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे शक्य - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, October 6, 2026

चमत्कार प्रशिक्षणातून विद्यार्थी व महिलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे शक्य




अंधश्रद्धा निर्मूलनासाठी प्रयोगातून प्रबोधनाची गरज : विजय डवरे


अमरावती, दि. ६ : समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी केवळ भाषणांमधून प्रबोधन न करता प्रत्यक्ष चमत्कारांचे प्रयोग करून त्यामागील वैज्ञानिक कारणे समजावून सांगणे आवश्यक आहे. चमत्कार प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी, महिला आणि नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करून अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य अधिक प्रभावीपणे करता येऊ शकते, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा प्रधान सचिव विजय डवरे यांनी केले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अमरावती शहर शाखेच्या वतीने दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी गुरुदेव सेवाश्रम, राधा नगर, अमरावती येथे चमत्कार प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा प्रशिक्षक प्रमोद कोलमकर यांनी विविध चमत्कारांचे प्रयोग प्रत्यक्ष करून दाखविले. या प्रयोगांमागील वैज्ञानिक तत्त्वे, मानवी मनाची भूमिका तसेच चमत्कारांच्या नावाखाली केली जाणारी फसवणूक याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.

विशेष म्हणजे, प्रशिक्षणार्थींनाही विविध प्रयोग स्वतः करून पाहण्याची संधी देण्यात आली. त्यामुळे चमत्काराकडे आश्चर्य किंवा भीतीने पाहण्याऐवजी त्यामागील वैज्ञानिक कारण शोधण्याची सवय निर्माण करण्यावर कार्यशाळेत भर देण्यात आला. ‘चमत्कार नाही, त्यामागे विज्ञान आहे’ हा विचार प्रत्यक्ष प्रयोगांच्या माध्यमातून सहभागींपर्यंत पोहोचविण्यात आला.

कार्यशाळेदरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, विवेकवादी विचार आणि संविधानिक मूल्ये याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत व्यसनमुक्ती प्रबोधन परदर्शनी तसेच संविधान जागर प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती. या प्रदर्शनातून व्यसनांचे दुष्परिणाम, अंधश्रद्धेमुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक समस्या आणि संविधानाने दिलेली वैज्ञानिक दृष्टिकोनाची मूल्ये याबाबत जनजागृती करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सोशल मीडिया कार्यवाह प्रवीण गुल्हाने यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रफुल्ल मंदा श्रीधर, दिलीप लाडे, मंजू वासनिक, प्रतिभा खापरे, सचिन खोब्रागडे, गजेंद्र लोणारे, नरेंद्र तायवांडे, संजय खापरे, ओमप्रकाश सुखदेवे, सविता सुखदेवे आणि रहमत शहा यांनी सहकार्य केले. आशिष देशमुख यांनी आयोजनासाठी विशेष सहाय्य केले.

कार्यक्रमाचे संचालन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बडनेरा शहर शाखेचे कार्याध्यक्ष दिलीप लाडे यांनी केले. तर अमरावती शहर शाखेचे कार्याध्यक्ष सचिन खोब्रागडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य समाजाच्या विविध घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा प्रकारच्या प्रशिक्षण कार्यशाळा, प्रत्यक्ष प्रयोग आणि प्रबोधनात्मक उपक्रम सातत्याने राबविण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेक आणि संविधानिक मूल्यांच्या आधारे अंधश्रद्धामुक्त समाजनिर्मितीसाठी सामूहिक प्रयत्न करण्याचा संदेश या कार्यशाळेतून देण्यात आला.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages