मेळघाटातील सुविधा, सुरक्षेवर भर देणार -गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, March 2, 2026

मेळघाटातील सुविधा, सुरक्षेवर भर देणार -गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

 








*धारणी पोलीस स्टेशनला भेट

*अभ्यासिकेत पुस्तकांचे वाटप

अमरावती, दि. 3 (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील धारणी आणि चिखलदरा या दुर्गम भागांच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. या भागाच्या समस्या जाणून परिसराचा कायापालट करण्यात येणार आहे. प्रामुख्याने मेळघाटातील सुविधा, सुरक्षेवर भर देणार आहे, असे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितले.

दि. २८ फेब्रु ला  डॉ. भोयर यांनी धारणी येथील पोलीस स्टेशनला भेट देऊन पोलीस ठाण्याच्या कामकाजाचा आढावा घेतला, तसेच विविध उपक्रमांची पाहणी केली. यावेळी आमदार केवलराम काळे, प्रभुदास भिलावेकर, नगराध्यक्ष सुनील चौथमल, जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद, सहाय्यक जिल्हाधिकारी तसेच प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला, उपविभागीय पोलीस अधिकारी महादेव गरुड, तहसीलदार प्रदीप शेवाळे, पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक संध्या चव्हाण, गटविकास अधिकारी विजय गायकवाड, गटशिक्षणाधिकारी वैभव लादे आदी उपस्थित होते.

डॉ. भोयर यांनी, बऱ्याच वर्षांनंतर या आदिवासी बहुल भागाचा दौरा करण्याची संधी मिळाली आहे. तसेच या भागातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती पाहण्यासाठी धारणी पोलीस स्टेशनला भेट देण्यात आल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी पोलीस प्रशासनाच्या कामकाजाचा आढावा घेतला आणि स्थानिक नागरिकांच्या समस्या तसेच त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या.

स्थानिक आमदार आणि लोकप्रतिनिधी यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांसाठी नवीन अभ्यासिका इमारत बांधण्यात आली आहे. या शैक्षणिक सुविधेबद्दल स्थानिक लोकप्रतिनिधींचे कौतुक करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ठरणारे पुस्तके वाटप केली. दुर्गम भागातील नागरिकांना आवश्यक असणाऱ्या पायाभूत सोयी-सुविधा पुरवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येणार आहे. मेळघाटचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली योजना राबविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ. भोयर यांनी धारणी पोलीस स्टेशन येथील पाणपोईचे लोकार्पण केले. तसेच गुन्हे तपास प्रक्रियेला गती देण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या फॉरेन्सिक वाहनाचे उद्घाटन केले.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages