जागतिक कौशल्य स्पर्धेच्या राज्यस्तरीय फेरीत अमरावतीची बाजी - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, February 13, 2026

जागतिक कौशल्य स्पर्धेच्या राज्यस्तरीय फेरीत अमरावतीची बाजी

 






विजेत्यांच्या जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते सत्कार

चार विजेत्यांनी उंचावला जिल्ह्याचा नावलौकिक

अमरावती, दि. १४ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): जागतिक कौशल्य स्पर्धेच्या राज्यस्तरीय फेरीत जिल्ह्यातील चार उमेदवारांनी यश संपादन केले आहे. या कामगिरीमुळे कौशल्य विकास क्षेत्रात जिल्ह्याने गरुडझेप घेतली असून, ही बाब जिल्ह्यासाठी गौरवास्पद असल्याचे मत जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी व्यक्त केले.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयात आयोजित एका विशेष कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांच्या हस्ते या यशस्वी उमेदवारांचा त्यांच्या पालकांसह गुणगौरव करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

समाजात स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी कौशल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आज अनेक नवीन संधी विद्यार्थ्यांना खुणावीत आहेत. तरुणांनी विविध क्षेत्रात आपली कौशल्ये विकसित करावीत, असे  श्री. येरेकर म्हणाले. या विजेत्यांना पुढील प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रवासासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्वतोपरी मार्गदर्शन व मदत करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

या स्पर्धेत अमरावतीला दोन प्रथम आणि दोन द्वितीय क्रमांकाची पारितोषिके मिळाली आहेत. यामध्ये फार्मसीची विद्यार्थिनी असलेल्या कु. सारथा (निशा) बंड हिने केवळ कुकिंग या छंदाच्या जोरावर राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तसेच आदर्श लिहारे याने सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. पुण्या-मुंबईच्या स्पर्धकांसमोर सुरुवातीला मनात शंका होती, मात्र निकालानंतर आपणही कोणापेक्षा कमी नाही हा विश्वास मिळाल्याचे आदर्शने आपल्या मनोगतात सांगितले.

शशांक लोखंडे यांनी इलेक्ट्रॉनिक्समध्ये आणि विराज पुसदकर यांनी केमिकल लॅबोरेटरी असिस्टंट या विषयात द्वितीय क्रमांक पटकावून जिल्ह्याची शान वाढविली आहे.

'कौशल्यांचे ऑलिम्पिक' मानली जाणारी ही स्पर्धा दर दोन वर्षांनी होते. 2026 ची जागतिक स्पर्धा शांघाई (चीन) येथे आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून राज्यभरात 63 क्षेत्रांत स्पर्धा घेण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये अमरावतीच्या 15 उमेदवारांनी प्रतिनिधित्व केले होते. आता या चारही विजेत्यांची निवड पुढील प्रादेशिक फेरीसाठी झाली असून, जिल्हा कौशल्य विकास कार्यालयाने घेतलेल्या विशेष मेहनतीबद्दल विजेत्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.



Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages