एक सत्य कथा _ फुलासंगे मातीस वास लागे* - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, February 13, 2026

एक सत्य कथा _ फुलासंगे मातीस वास लागे*



मथळ्याचा अर्थ स्पष्ट आहे _

" संगत आणि सान्निध्य जर ज्ञानी महापुरुषांचे लाभत असेल तर सामान्य सुद्धा सर्वमान्य होतो " !!


या संदर्भातील एक सत्य घटना उद्बोधक आहे.__

जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आईन्स्टाईन यांना त्यांच्या संशोधनावरील विचार मांडण्यासाठी वेगवेगळ्या संस्थे कडून आदराने आमंत्रित केले जात असे..आईन्स्टाईन सुद्धा जिज्ञासूंची बौद्धिक भूक शमविण्यात आनंद मानीत...एका नामांकित संस्थेत त्यांना एकदा भाषण देण्यासाठी जायचे होते....आपल्या नेहमीच्या ड्रायव्हरला सोबत घेऊन ते इप्सित स्थळी जाण्यासाठी प्रवास करू लागले......आईन्स्टाईन चा ड्रायव्हर खूपच तल्लख होता....आईन्स्टाईन ला तो सहज बोलून गेला __" सर.... मी अनेक वर्षांपासून आपली भाषणे ऐकत आहे.... आणि ती सर्व भाषणे मी मनामध्ये साठवली आहे......संधी मिळाली तर मी सुद्धा भाषण करू शकतो....."

आपल्या आवडत्या ड्रायव्हर चा आत्मविश्वास बघून आईन्स्टाईन मनोमन आनंदीत होऊन बोलले _" हे बघ...आज आपण ज्या ठिकाणी जात आहोत तेथे मला कोणी ओळखत नाही.....आज प्रमुख वक्ता म्हणून तुच भाषण करशील आणि मी तुझा ड्रायव्हर म्हणून प्रेक्षकांत बसेल.."!आपल्या साहेबांचे बोल ऐकून ड्रायव्हर थक्क झाला...त्याने आपल्या मनाशी खूणगाठ बांधली..विशिष्ट निर्धाराने तो मनोमन खुश होऊन गाडी चालवू लागला.....

कार्यक्रम स्थळी पोहोचताच प्रमुख वक्त्याच्या आविर्भावात तो ( ड्रायव्हर ) व्यासपीठावर गेला....आदरसत्काराची औपचारिकता आटोपताच त्याने आईन्स्टाईन च्या शैलीत उत्तम भाषण केले....विज्ञानावरील अद् भूत माहिती आणि सांगोपांग विश्लेषण ऐकून सारे श्रोते भारावून गेले.....भाषण संपल्यानंतर एका श्रोत्याने जिज्ञासेपोटी एक अवघड प्रश्न विचारला.....प्रश्न क्लिष्ट होता आणि त्याचे उत्तर वेळेवर वक्ता झालेल्या ड्रायव्हर जवळ नव्हते.....

पण आपल्या ज्ञानाच पितळ उघडं पडू नये ह्यासाठी प्रसंगावधान राखत तो सहजतेने बोलला__" हे बघा... आपण फार सोपा प्रश्न विचारला....या प्रश्नाचे उत्तर तर माझा ड्रायव्हर सुद्धा देऊ शकतो..."

आणि त्याने प्रेक्षकांमध्ये ड्रायव्हर च्या भूमिकेत बसलेल्या आईन्स्टाईन यांना स्टेजवर येण्याची विनंती केली.....

आईन्स्टाईन शांत मनाने व्यासपीठावर गेले.....प्रश्न विचारणाऱ्या जिज्ञासू कडे बघत त्यांनी अतिशय समर्पक आणि यथार्थ उत्तर देऊ संपूर्ण सभागृहाला चकित केले..कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला.....!

परतीच्या मार्गावर शांतपणे गाडी चालवणाऱ्या आपल्या ड्रायव्हर कडे आईन्स्टाईन मात्र कौतुकाने बघत होते.

लेखक_ नानासाहेब देवतळे  

             शिरजगाव कसबा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages