उर्ध्व वर्धा कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न; - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, February 13, 2026

उर्ध्व वर्धा कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न;



          

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची पाणी आरक्षणास मंजुरी

अमरावती, दि. १४(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे उर्ध्व वर्धा प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समिती व पाणी आरक्षणाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत सन 2025-26 या वर्षासाठी उर्ध्व वर्धा प्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या पाणी आवर्तनाचे नियोजन आणि बिगर सिंचन पाणी आरक्षणाबाबत चर्चा करून विविध निर्णयांना मंजुरी देण्यात आली.

उर्ध्व वर्धा प्रकल्पाचे लाभक्षेत्र अमरावती आणि वर्धा या दोन्ही जिल्ह्यांत असून, प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या दोन्ही कालव्यांमधून रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अधीक्षक अभियंता मनीष राजभोज यांनी बैठकीत माहिती दिली की, रब्बी हंगाम 2025-26 साठी एकूण 31 हजार हेक्टर सिंचन क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत या दोन्ही कालव्यांद्वारे 3 पाणी पाळ्यांची आवर्तने पूर्ण झाली असून, त्यातून 10 हजार हेक्टर क्षेत्रावर सिंचन झाले आहे. उर्वरित 2 आवर्तने मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असून, जलसंपदा व कृषी विभागाने समन्वय साधून उन्हाळी पिकांच्या क्षेत्रात वाढ करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी  श्री. येरेकर यांनी यावेळी दिले.

या बैठकीत सन 2025-26 या वर्षासाठी बिगर सिंचन पाणी आरक्षणासही मंजुरी प्रदान करण्यात आली. यामध्ये पिण्यासाठी 61.911 दलघमी, औष्णिक वीज केंद्रासाठी 25.000 दलघमी आणि संभाव्य औद्योगिक पाणीपुरवठ्यासाठी 2.50 दलघमी असे एकूण 89.411 दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. बिगर सिंचन ग्राहक पाणीपुरवठा योजनेची थकबाकी मोठ्या प्रमाणात असल्याचे निदर्शनास आल्यामुळे, संबंधित यंत्रणांनी मार्च 2026 पूर्वी ही थकबाकी वसूल करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी  यावेळी दिल्या.

या बैठकीला दूरदृष्य प्रणालीद्वारे विधानपरिषद सदस्य दादारावजी केचे उपस्थित होते. सर्व लाभधारकांना विहित वेळेत पाणी पोहोचण्याबाबत नियोजन करण्याचे त्यांनी निर्देश दिले. बैठकीस उर्ध्व वर्धा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता अनिकेत सावंत, जिल्हा कृषी अधिकारी राहुल सातपुते, महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक एस. पी. देशमुख, कार्यकारी अभियंता अमोल गुरव, गु. उमप यांच्यासह उर्ध्व वर्धा सिंचन मंडळाचे सर्व उपविभागीय अभियंता उपस्थित होते.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages