Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

काटआमला येथे ‘गावभेट’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

 


ग्रामस्थांच्या समस्यांवर प्रशासनाचा थेट संवाद

अमरावती, दि. १४ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): शासनाच्या विविध कल्याणकारी योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी आणि प्रशासनाने थेट जनतेच्या दारी जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशान्वये 'गावभेट' उपक्रम राबविण्यात येत आहे. अमरावती तालुक्यातील काटआमला येथे 'गावभेट' उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या या उपक्रमात ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या अडचणी प्रशासनासमोर मांडल्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच श्रीमती प्रज्ज्वल मिलके होत्या. यावेळी प्रा. अनिरुद्ध पाटील यांनी महिलांच्या समस्या व कायदेविषयक मार्गदर्शन केले. शेतीतज्ज्ञ प्रा. आर. के. पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले. महसूल व इतर विभागांच्या वतीने उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, तहसीलदार विजय लोखंडे, सुनील राणा, नायब तहसीलदार सुनील रासेकर यांसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

या उपक्रमाची सुरुवात वृक्षदिंडीने झाली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर गावात 'शिवारफेरी' काढण्यात आली. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या घरकुलांना भेटी देण्यात आल्या, तसेच 'मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता' योजनेअंतर्गत अडथळा असलेला एक पाणंद रस्ता मोकळा करण्यात आला.

सभेत ग्रामस्थांच्या  विविध मागण्या व तक्रारी जाणून घेण्यात आल्या. उपस्थित अधिकाऱ्यांनी या समस्या प्राधान्याने सोडविण्याबाबत सकारात्मक भूमिका घेत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. शाळेतील बालकलाकारांनी पर्यावरण संवर्धन, 'पाणी अडवा-पाणी जिरवा' आणि वृक्ष लागवड या विषयावर  नाटक सादर केले. शासन आणि ग्रामस्थ यांच्यातील संवाद अधिक दृढ करण्यासाठी आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी हा गावभेट उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत आहे.


Post a Comment

0 Comments