शिरजगाव आणि करजगावात चिंचोक्यापासून साकारलेला गणपती... - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, September 5, 2025

शिरजगाव आणि करजगावात चिंचोक्यापासून साकारलेला गणपती...


अमरावतीच्या शिरजगाव आणि करजगाव या दोन्ही गावांत चिंचोक्यांपासून बनवलेल्या गणेश मूर्ती विराजमान आहेत. गत ८६ वर्षांपासून गणेशोत्सवात या मूर्तींची मिरवणूक काढली जाते.


अमरावती : श्री गणरायाची भव्य आणि सुरेख मूर्ती आणि त्यासमोर हनुमान आणि गरुडदेवाची मूर्ती. श्री गणेशाचं हे स्वरुप चांदूरबाजार तालुक्यातल्या शिरजगाव आणि करजगाव या दोन्ही गावात पाहायला मिळतं. विशेष म्हणजे या दोन्ही मूर्ती चिंचोक्यांनी बनवल्या आहेत. गत ८६ वर्षांपासून गणेशोत्सवात या मूर्तींची मिरवणूक काढली जाते. 

मूर्तीचा इतिहास : स्वातंत्र्यपूर्व काळात, शिरजगाव येथील मूर्तिकार गंगाराम वांगे यांनी १५ सप्टेंबर १९३९ रोजी गणपतींसह हनुमान आणि गरुडदेवाची अतिशय देखणी मूर्ती साकारली. ही मूर्ती शिरजगाव येथील श्री राम मंदिरात स्थापन करण्यात आली. लगतच्या करजगाव येथील रजनी खेरडे या शिरजगावला बहिणीकडे आल्या असता, त्यांच्या नजरेत ही मूर्ती भरली. त्यांनी अशीच मूर्ती स्वतःसाठी बनवून मागितली. गंगाराम वांगे आणि त्यांचे शिष्य बळीराम कविटकर यांनी पुन्हा गणपती, हनुमान आणि गरुडदेवाची मूर्ती घडवली. ती मूर्ती रंजना खेरडे यांनी करजगावला नेली. सध्या ही मूर्ती करजगाव येथील श्री गजानन महाराज मंदिरात विराजमान आहे. हा गणपती सार्वजनिक भक्ती, एकत्रित कुटुंबीय आणि गावाच्या परंपरेची साक्ष आहे. 

चिंचोक्यापासून मूर्ती कशी तयार केली?:गणपती, हनुमान आणि गरुडदेव या तिन्ही मूर्ती चिंचोक्यांच्या मूर्ती म्हणून प्रसिद्ध आहेत. १९३९  मध्ये मूर्तिकार गंगाराम वांगे यांनी चिंचेमध्ये असणारे हजारो चिंचोके एकत्र केले. या चिंचोक्यांबरोबर कागदाचे तुकडेही एकत्र करून त्यांचा कुटून लगदा तयार केला गेला.
या लगद्यात सरस, माती आणि ताग यांचा वापर करून मूर्तींचे विविध अवयव तयार करून एकत्र जोडण्यात आले. या मूर्ती वजनानं हलक्या असून सहजपणे मिरवणूक काढता येतात, अशी माहिती शिरजगाव येथील रहिवासी आणि मूर्तिकार अरुण गवळी यांनी दिली. ते म्हणाले की, अधूनमधून या मूर्तींची रंगरंगोटी करणं आणि कुठं काही भेगा पडल्यास त्यांची दुरुस्ती करण्याचं काम ते करत असतात. 
शिरजगाव येथील श्री राम मंदिर आणि करजगाव येथील श्री गजानन महाराज मंदिराजवळील गणेशोत्सव मंडळातून अनंत चतुर्दशीच्या दिवशी भव्य मिरवणूक काढली जाते.चिंचोक्यांच्या या मूर्ती नवसाला पावतात, अशी श्रद्धा आणि विश्वास स्थानिक लोकांमध्ये आहे, असं शिरजगाव येथील गावकरी सांगतात .

दोन्ही मूर्तींमधला फरक : शिरजगाव आणि करजगाव या दोन्ही ठिकाणी एकसारख्या दिसणार्या चिंचोक्यांच्या गणपती मूर्ती आहेत. या गणपतींच्या समोर असलेले श्री हनुमान आणि गरुडदेवही समान आहेत. मात्र, दोन्ही मूर्तींमध्ये एकच फरक आढळतो. करजगाव येथील गणपतीसमोर असलेल्या हनुमानाच्या खांद्यावर श्री राम आणि लक्ष्मण बसलेले आहेत, तर शिरजगाव येथील श्री राम मंदिरातील गणरायाच्या समोर हनुमानाच्या खांद्यावर श्री राम आणि लक्ष्मण नाहीत.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages