अमरावती पोलीस आयुक्तालयात 'ग्रीन एनर्जी'चा वापर ; 105 किलोवॅटच्या सौरऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीतून ऊर्जाबचत व पर्यावरणपूरकतेचा मोठा लाभ - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, September 24, 2025

अमरावती पोलीस आयुक्तालयात 'ग्रीन एनर्जी'चा वापर ; 105 किलोवॅटच्या सौरऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीतून ऊर्जाबचत व पर्यावरणपूरकतेचा मोठा लाभ

 




अमरावती, दि. 25 : ऊर्जा बचत आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी अमरावती पोलीस आयुक्तालय आणि कार्यालय परिसरात 105 किलोवॅट क्षमतेचा सौर विद्युत प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. सुमारे 72 लक्ष रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे पोलीस यंत्रणा आता पारंपरिक विजेवर कमी प्रमाणात अवलंबून राहणार आहे. यामुळे वीज खर्चात मोठी बचत होणार असून अमरावती पोलीस विभागाचा हा उपक्रम संपूर्ण राज्यासाठी एक आदर्श ठरला आहे.

            या सौरऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून संपूर्ण आयुक्त कार्यालय व परिसराचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. तसेच पोलीस परेड मैदान येथे 9 मीटर उंचीचे तीन एल.ई.डी. हायमास्ट दिवे देखील कार्यान्वित करण्यात आले असून, यामुळे रात्रीच्या वेळी आयुक्तालयाचा परिसर प्रकाशमान आणि सुरक्षित झाला आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी जिल्हा नियोजन समिती योजनेतून रु. 71.76 लक्ष इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला. या प्रकल्पाच्या माध्यमातून सौर ऊर्जेचा वापरामुळे भविष्यात होणाऱ्या वीज खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. पर्यावरणपूरक तंत्रज्ञान, हरित ऊर्जा आणि शाश्वत विकास याचे आदर्श उदाहरण म्हणून अमरावती पोलीस विभागाचा हा उपक्रम संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

        या प्रकल्पाची एकूण क्षमता 105 किलोवॅट असून पारेषण संलग्न सौर प्रकल्प प्रकारात हा मोडतो. जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त 71.61 लाख निधीतून हा प्रकल्प उभारण्यात आला असून सहा महिन्याचा कालावधी प्रकल्प पूर्ण होण्यासाठी लागला आहे. या सौर प्रकल्पाच्या अंमलबजावणीनंतर पारंपरिक वीज खर्चात लक्षणीय घट झाली आहे. प्रकल्पापूर्वी आयुक्तालयाचा मासिक वीज खर्च ₹१,०२,००० ते ₹२,०७,००० पर्यंत होता. मात्र, सप्टेंबर २०२५ च्या वीज बिलात हा खर्च केवळ ₹२९० इतका नोंदवला गेला आहे. या माहितीनुसार, पोलीस विभागाची वार्षिक सुमारे ₹१५,७४,००० ची बचत होणार आहे. तसेच वर्षाला सुमारे १३८ ते १५३ मेट्रिक टन कार्बन (CO₂) उत्सर्जन कमी होणार आहे.

अमरावती पोलीस आयुक्तालयाने 'स्मार्ट व ग्रीन गव्हर्नन्स'च्या दिशेने उचललेले हे पाऊल इतर शासकीय संस्थांसाठीही प्रेरणादायी ठरेल. "हरित ऊर्जा - सुरक्षित भविष्य" या संकल्पनेला बळ देणारा हा प्रकल्प केवळ एक प्रशासकीय उपक्रम नसून, एक यशस्वी यशोगाथा आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages