शनिवार व रविवारी मोर्शीत ‘ग्रंथोत्सव’ - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, October 2, 2026

शनिवार व रविवारी मोर्शीत ‘ग्रंथोत्सव’



 

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते उद्घाटन

 

             अमरावती,दि.२ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने शनिवार, ३ व रविवार,४ ऑक्टोबर रोजी मोर्शी येथील पंजाबबाबा सभागृहात ‘ग्रंथोत्सव-२०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होणार असून ग्रंथ प्रदर्शन व विक्रीसोबतच विविध साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रंथप्रेमी,साहित्य रसिक नागरिकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन, जिल्हा ग्रंथालय अधिकारी तथा ग्रंथोत्सव समितीचे सदस्य सचिव डॉ.अतुल वानखडे यांनी केले आहे.

 

            महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरणांतर्गत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने दोन दिवशीय  ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विभागीय आयुक्त नयना गुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वा. ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होणार असून ज्येष्ठ साहित्यिक विठ्ठल कुलट हे विशेष अथिती म्हणून उपस्थित राहरणार आहेत ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. तत्पूर्वी, उपविभागीय अधिकारी प्रदीप पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी १० वा. ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहे.

 

            ग्रंथोत्सवाच्या पहिल्या दिवशी दुपारी १२ वा. ‘भारताचा रक्तरंजीत इतिहास’ विषयावर प्रा.जगदिश पाटील यांचे व्याख्यान होणार आहे सहायक ग्रंथालय संचालक डॉ. राजेश पाटील हे अध्यक्षस्थानी असतील. दुपारी १ ते १.३० वाजेदरम्यान प्रसिद्ध कवी धीरज चावरे हे 'हास्य कवितांचा विनोदी कार्यक्रम' सादर करणार आहेत. तर दुपारी २ ते ४.३० वा. दरम्यान ‘पुस्तकाची मैत्री’ विषयावर परिसंवाद होणार आहे.

 

             दुसऱ्या दिवशी सकाळी ११ ते दुपारी १ वाजे दरम्यान दोन व्याख्यान आणि एकपात्री प्रयोग सादर होणार आहेत. त्यातील पहिले व्याख्यान ‘सार्वजनिक ग्रंथालयामधील सॉफ्ट स्किल्स आंतरवैयक्तीक कौशल्य आणि व्यावसायीक क्षमता’ विषयावर  डॉ.रविंद्र सरोदे यांचे तर ‘वाचन संस्कृती काल आज आणि उद्या’ विषयावर डॉ. राजेश बोबडे यांचे व्याख्यान होणार आहे. हर्षदा इंदोन यांचा ‘मी वाचन संस्कृती बोलते’ हा एकपात्री नाट्य प्रयोग तर आचल सरदार यांचा ‘चला हसू या गाऊ या’ हा नक्कल व गीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे.

 

            दुपारी २ ते ४ वाजे दरम्यान ‘कविसंमेलन’ होणार आहे. प्रसिद्ध गझलकार नितीन देशमुख अध्यक्ष स्थानी असतील तर गजानन देशमुख,विशाल मोहोड,किशोर जराड, अलका तालनकर,संदीप देशमुख,प्रणाली देशमुख,विशाल कनेकर हे कवि सहभाग घेणार आहेत. दुपारी ४ ते ५ वाजेदरम्यान ग्रंथोत्सवाचा समारोप होणार आहे. विभागीय ग्रंथालय संघाचे प्रभाकर घुगे हे अध्यक्ष  स्थानी असतील तर शासकीय विभागीय ग्रंथालयाचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय बनसोड आणि जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष चंद्रकांत चांगदे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages