2 ते 8 ऑक्टोबरदरम्यान विद्यार्थी व नागरिकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन
अमरावती, दि २ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावतीच्या वतीने २ ते ८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत वन्यजीव संवर्धन, नैसर्गिक अधिवासांचे संरक्षण आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी ‘अधिवास जोडणीकरण, वन्यजीवांचे सक्षमीकरण’ या संकल्पनेवर आधारित विविध शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत. वन्यजीव आणि त्यांच्या अधिवासांचे संरक्षण ही सामूहिक जबाबदारी असून विद्यार्थी, शिक्षक, स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांनी या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मेळघाट व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने केले आहे.
वन्यजीव सप्ताहाच्या आयोजनात मेळघाट व्याघ्र प्रकल्पासोबतच अरण्यम् कंझर्व्हेशन सोसायटी, युथ फॉर नेचर कन्झर्व्हेशन ऑर्गनायझेशन, नेचर सोसायटी, ऑर्गनायझेशन फॉर कुला, वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था आणि पर्यावरण संवर्धन शिक्षण संस्था यांचा सहभाग राहणार आहे. अमरावतीतील विविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थी या उपक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.
वन्यजीव सप्ताहाचे उद्घाटन २ ऑक्टोबर रोजी अमरावती येथील कुलाढाप सभागृहात होणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण स्वयंसेवक कार्यशाळा, बांबू उद्यानात निसर्गभ्रमंती तसेच वन्यजीव विषयावरील चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. तापडिया सिटी सेंटर येथे वन्यजीव छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात येणार असून ते सर्व नागरिकांसाठी खुले राहणार आहे. सप्ताहादरम्यान शालेय विद्यार्थ्यांसाठी वन्यजीव माहितीपट व चित्रपट प्रदर्शन, निसर्ग प्रश्नमंजुषा, पोस्टरनिर्मिती, पर्यावरणविषयक कविता तसेच वने व वन्यजीव सहजीवनावर आधारित रांगोळी स्पर्धा घेण्यात येणार आहेत. बिबट्यासोबत सहजीवनाबाबत जागरूकता कार्यशाळा, ‘टॉक विथ ट्री’ उपक्रम, वन्यजीवविषयक व्याख्याने व सादरीकरणे यांचाही कार्यक्रमात समावेश आहे. जलसंवर्धन तसेच प्लास्टिक बाटल्यांच्या पुनर्वापराबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
मेळघाट परिसरात प्लास्टिक संकलन व निर्मूलन मोहीम राबविण्यात येणार आहे. चिखलदरा येथील निवासी अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी पक्षीनिरीक्षणाचा उपक्रम, तर आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमांद्वारे विविध गटांतील विद्यार्थ्यांना निसर्गाशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
वन्यजीव सप्ताहाचा समारोप ८ ऑक्टोबर रोजी कुलाढाप सभागृह, मेळघाट व्याघ्र प्रकल्प कार्यालय, अमरावती येथे होणार असून विविध स्पर्धांतील विजेत्यांना बक्षिसे व प्रमाणपत्रे वितरित करण्यात येणार आहेत.