केंद्रीय पथक शेतकऱ्यांच्या बांधावर ! - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, October 11, 2026

केंद्रीय पथक शेतकऱ्यांच्या बांधावर !



> दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या

> कापूस, सोयाबीन, तूर पिकांची प्रत्यक्ष पाहणी व मूल्यांकन

> दुष्काळी संकटाशी दोन हात करण्यासाठी शेतकऱ्यांना दिला धीर

> शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक

> पीक परिस्थितीचा अहवाल केंद्र सरकारला सादर करणार

 

यवतमाळ, दि. १२ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : यंदाच्या खरीप हंगामात पावसातील खंड आणि पिके करपल्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या आंतरमंत्रालयीन केंद्रीय पथकाने आज यवतमाळ जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागांचा दौरा केला. पथकाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कापूस, सोयाबीन आणि तूर पिकांची प्रत्यक्ष पाहणी व मूल्यांकन केले. तसेच दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्यथा, अडचणी आणि मागण्या जाणून घेत त्यांना संकटाशी दोन हात करण्यासाठी धीर दिला.


 

यंदाच्या खरीप हंगामात पावसाचा खंड पडल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळाचा ट्रिगर-१ लागू केला आहे. बाधित शेतकऱ्यांना राज्य शासनासोबतच केंद्र सरकारकडूनही मदत मिळावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन मदतीची मागणी केली होती. त्यानंतर दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी व नुकसानीचे मूल्यमापन करण्यासाठी केंद्रीय पथक जिल्ह्यात दाखल झाले.

 

या पथकात केंद्रीय जलसंपदा विभागाच्या संनियंत्रण संचालनालयाचे संचालक तथा पथकप्रमुख अर्जेश कुमार मधोक, वित्त मंत्रालयाच्या व्यय विभागाचे सहसंचालक महेश कुमार, कृषी व शेतकरी कल्याण विभागाच्या अवर सचिव सीमा राणी आणि ग्रामीण विकास विभागाचे अवर सचिव संजय मीना यांचा समावेश होता.


पथकाने यवतमाळ तालुक्यातील मडकोना व लासिना, तसेच नेर तालुक्यातील लोणी, मांडवगड, वटफळी आणि दोडकी या गावांना भेट दिली. यावेळी शेतातील कापूस, सोयाबीन आणि तूर पिकांची पाहणी करून पिकांची सद्यस्थिती, पावसातील खंडामुळे झालेली हानी आणि शेतीसमोरील अडचणींची माहिती घेतली. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या व अपेक्षा जाणून घेतल्या. दुष्काळी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीच्या दृष्टीने केंद्र सरकार सकारात्मक असल्याचा विश्वासही या दौऱ्यातून व्यक्त करण्यात आला.

 

श्री गौरक्षण गौशाळेची पाहणी



केंद्रीय पथकाने यवतमाळ शहरातील श्री गौरक्षण संस्थेला भेट देऊन गौशाळेची पाहणी केली. यावेळी गायींची संख्या, उपलब्ध चारा आणि पशुधनासाठी राज्य शासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. पथकातील सदस्यांनी गौशाळेतील गायींना पशुखाद्य भरवून पशुधनाप्रती आपुलकीची भावना व्यक्त केली.

 


लघुसिंचन प्रकल्पाची पाहणी

यवतमाळ तालुक्यातील किटा कापरा येथील लघुसिंचन प्रकल्पालाही पथकाने भेट दिली. प्रकल्पातील घटलेल्या पाणीपातळीची स्थिती जाणून घेतली. उपलब्ध पाणीसाठा, पाण्याचे स्रोत, भूजल पातळी तसेच सिंचन प्रकल्प आणि विहिरींची पाणीपातळी वाढविण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. दुष्काळी परिस्थितीत पाणी व्यवस्थापनाचे महत्त्व लक्षात घेऊन संबंधित बाबींची माहिती संकलित करण्यात आली.

 

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांशी संवाद

दौऱ्यादरम्यान केंद्रीय पथकाने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. शेतीतील संकटे, आर्थिक अडचणी आणि कुटुंबाला भेडसावणाऱ्या समस्यांची माहिती घेतली.

 

जिल्ह्यातील पीक परिस्थिती, शेतकऱ्यांचे नुकसान, पशुधनासाठी चारा उपलब्धता आणि सिंचन व भूजल स्थिती या विविध बाबींच्या प्रत्यक्ष पाहणीच्या आधारे केंद्रीय पथकाकडून अहवाल तयार करून केंद्र सरकारला सादर करण्यात येणार आहे. या अहवालाच्या आधारे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र शासनाकडून मदत मिळण्याबाबत पुढील कार्यवाही होणार आहे.

 

या दौऱ्यात केंद्रीय पथकासोबत जिल्हाधिकारी विकास मीना, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, यवतमाळ पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता योगेश सोनवणे, उपविभागीय अधिकारी गोपाळ देशपांडे, विजय सुर्यवंशी, यवतमाळ सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक, जिल्हा जलसंधारण अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, पशुसंवर्धन उपायुक्त, तहसिलदार, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी आदी उपस्थित होते.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages