नवरात्र म्हणजे केवळ नऊ दिवसांचा उत्सव नाही, तर तो विश्वातील आद्यशक्तीचा, सर्जनशीलतेचा आणि अंधारावर प्रकाशाने मिळवलेल्या विजयाचा महोत्सव होयं. महिषासुराचा संहार करणाऱ्या दुर्गेचे रूप आठवून आपण जेव्हा गरब्याच्या तालावर थिरकतो, तेव्हा मनात एक सहज विचार येतो—‘स्त्री हीच जगाची निर्मिती आहे आणि तीच जगाचे रक्षणकर्तीसुद्धा.’
इतिहासाच्या पानांवरून आजच्या आधुनिक काळाकडे पाहताना, स्त्रीशक्तीचे हे बदललेले पण अमर राहिलेले रूप मनाला भावुक करून जाते.
वाचनातून कालची स्त्रीशक्ती पाहता त्याग आणि धैर्याचा हिरा आहे.कारण कालची स्त्री ही कौटुंबिक चौकटीत बांधलेली, पण कमालीची सोशीक आणि धैर्यवान होती. चुलीसमोर बसून कुटुंबासाठी आयुष्य वेचतांना तिच्या मनात मायेचा आणि त्यागाचा दीप सतत तेवत होता. परंतु, जेव्हा जेव्हा धर्मावर, देशावर किंवा स्वत्वावर आघात झाला, तेव्हा याच स्त्रीने हातात तलवारही घेतली.
राष्ट्रमाता जिजाऊंचे मार्गदर्शन असो, सावित्रीबाई फुलेंचा शिक्षणाचा लढा असो—कालच्या स्त्रीने हे सिद्ध केले की, ती शांत वाहणारी नदी जशी आहे, तसेच वेळ पडल्यास कडाडणारी वीजही बनू शकते. ‘कुटुंबाचा कणा’ म्हणून जगताना तिने तिच्या संस्कारांतून आणि धैर्यातून नव्या पिढ्या घडवल्या.
तर आजची स्त्रीशक्ती कर्तृत्व आणि आत्मविश्वासाचे उड्डाण घेत उंबरठ्याबाहेर पडून आकाशाला गवसणी घालत आहे. आज तिने स्वतःच्या कर्तृत्वाने सिद्ध केले आहे की:
"नका समजू आम्हाला अबला, आम्ही आहोत शक्तीचा अवतार"
आजची स्त्री केवळ चूल आणि मूल यापुरती मर्यादित राहिलेली नाही. ती अंतराळात झेप घेणारी शास्त्रज्ञ आहे, सीमेवर रक्षण करणारी सैनिक आहे, कॉर्पोरेट जगतात नेतृत्व करणारी मुख्य कार्यकारी अधिकारी आहे आणि त्याच वेळी आपल्या कुटुंबाची घट्ट वीण बांधून ठेवणारी आई, बहीण व पत्नीसुद्धा आहे. आजची स्त्री स्वतःचे निर्णय स्वतःचं घेते, तिच्या डोळ्यांत भविष्याची स्वप्ने आहेत आणि ती पूर्ण करण्याचे धाडस तिच्या पंखांत आहे.
उद्याची स्त्रीशक्ती: समता आणि क्रांतीची नवी पहाट
तसेचं उद्याची स्त्री ही अधिक स्वतंत्र, सशक्त आणि निर्भय असेल. ती लिंगभेदाच्या सर्व भिंती पाडून एक समान जग निर्माण करेल. उद्याच्या स्त्रीला तिचे हक्क मागण्यासाठी लढावे लागणार नाही, तर ती स्वतःचं तिचे भविष्य घडवेल.परंतु, उद्याची स्त्रीशक्ती कितीही आधुनिक झाली, तरी तिच्या हृदयातील संवेदनशीलता, करुणा आणि संस्कारांची जपणूक ती कधीही सोडणार नाही. तंत्रज्ञानाच्या युगातही मायेचा ओलावा जपणारी आणि समाजाला योग्य दिशा दाखवणारी ती एक 'तेजोमय क्रांती' असेल.
‘स्त्री’ म्हणजे केवळ नाव नाही, तो विश्वाचा श्वास आहे!
या नवरात्रात आपण केवळ देवीच्या मूर्तीची पूजा न करता, आपल्या घरात आणि समाजात असलेल्या प्रत्येक जिवंत स्त्रीशक्तीचा सन्मान करूया. तिच्यातील दुर्गेला ओळखूया, तिच्यातील सरस्वतीचे कौतुक करूया आणि तिच्यातील लक्ष्मीचे जतन करूया.
सर्वांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
कंचन मुरके, अमरावती
(प्रदेशाध्यक्ष)
महाराष्ट्र राज्य