शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान स्वायत्त संस्थेत मराठी पदव्युत्तर संशोधन मंडळ आणि मराठी वाड्मय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध कथाकार डॉ. सतीश तराळ यांच्या कथाकथन व कथाकथन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विभागप्रमुख डॉ. जनार्दन काटकर होते.
.सुरुवातीला संशोधक विद्यार्थीनी सुहानी ़ओगले यांनी आपली मधुरा ही कथा कथन केली. त्यानंतर दुसऱ्या संशोधक विद्यार्थीनी मनाली तायडे यांनी आपली कुस्करलेली कळी ही कथा कथन केली.
डॉ. सतीश तराळ यांनी सुरुवातीला महात्मा फुले द्विशताब्दी जन्म वर्ष व गांधी जयंती निमित्त महात्मा गांधी आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतींना उजाळा देऊन त्यांच्या कार्याचे अलौकिकत्व स्पष्ट केले. ते म्हणाले महात्मा गांधी विश्वातील सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्व मानले गेले तर महात्मा फुले महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्यिक व लोकशाही जनक्रांतीचे अग्रदूत मानले जातात. ते महान व्हाल्टेअर व क्रुडेसर होते. त्यानंतर कथा कशी कथन करावी याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी आपल्या कथाकथनाच्या अनेक आठवणी , गमती जमती सांगितल्या. कथाकथनात त्यांनी गंगा मिळाली यमुनेला ही बालभारती पुस्तकातील त्यांची बालकथा सादर केली. मानवातील पशुत्व आणि पशु मधील मनुष्यत्वाचे दर्शन घडविणारी ही कथा रसिकांच्या मनावर खूप परिणाम करणारी ठरली. नंतर त्यांनी मोजणी ही ग्रामीणकथा सांगितली. या कथेतून त्यांनी शेतकऱ्यांच्या यमायातना, ग्रामीण भागातील माणसांच्या स्वभावाचे विविध कंगोरे उलगडून दाखवले. शेवटी त्यांनी दोन विनोदीकथा सांगितल्या.आपल्या बहारदार कथनशैलीने त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांची साहित्यिक अभिरुची वाढून त्यांना साहित्य निर्मितीची प्रेरणा मिळाली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. जनार्दन काटकर यांनी विभागात झालेल्या कार्यक्रमांचा आढावा घेऊन पुढील काळात होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली व अशा साहित्यिक उपक्रमांचे महत्त्व सांगितले.सदर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संस्थेचे संचालक प्रा. डॉ. केशव तुपे यांनी मौलिक सहकार्य केले.
प्रास्ताविक भाषण प्रा. डॉ. राहुल फाटकर यांनी केले.तर पाहुण्यांचा परिचय पूजा बुल यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. स्मिता माळोदे यांनी केले तर आभार प्रा. तृप्ती बेलसरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विभागातील प्राध्यापक डॉ. संजय लोहकरे, प्रा. दिनेश डुडूल, प्रा. विद्या शेंडे, प्रा. दिपीका शिरसाट, संशोधक विद्यार्थीनी गीता गावंडे, आचल येवले,भारती आंबाडकर कुणाल कांबळे यांनी विशेष मेहनत घेतली. विभागातील विद्यार्थी निखिल मरस्कोल्हे,ॠत्विक तायडे, आदिनाथ धनवे, हर्षल देशमुख, अनिकेत मेश्राम,विक्की पोहनकर, साक्षी रोटे, दिव्यानी राऊत, तृप्ती वानखेडे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला एम. ए. भाग एक व दोनचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.