‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियाना’चा कार्यक्रम जाहीर - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, September 11, 2026

‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियाना’चा कार्यक्रम जाहीर

 


 


प्रलंबित महसुली दावे तडजोडीने मिटवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

 

अमरावती, दि. ११ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) :  ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानां’तर्गत जिल्ह्यातील विविध महसूल न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेले जमिनीशी संबंधित महसुली दावे तडजोडीने व आपापसांतील सहमतीने कायमस्वरूपी निकाली काढले जाणार आहेत. या अभियानाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी,उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी महसूल अदालत घेण्याबाबतचा कालबद्ध कार्यक्रम जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी  जाहीर केला असून या अभियानाचा लाभ घेत प्रलंबित महसुली दावे तडजोडीने मिटविण्याचे आवाहनही त्यांनी  केले आहे.

 


 

समाजातील शेवटच्या घटकांपर्यत न्याय आणि हक्क पोहोचवणे हे क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या विचाराचे मूळ सूत्र होते. शेतकऱ्यांसाठी त्यांनी केलेले कार्य दिशादर्शक व अमीट आहे. म्हणूनच त्यांच्या द्विशताद्बी जयंती वर्षाचे औचित्य साधून महसूल विभागातर्फे 1 सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीत राज्यभरात ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ राबविण्यात येत आहे. अमरावती जिल्ह्यातही हे अभियान राबविण्यात येणार असून  महसूल प्रशासनातील अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये जमिनीशी संबंधित दाखल महसूली दावे निकाली काढण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणाच्या लोक अदालतीच्या धर्तीवर महसूल अदालती आयोजित करण्यात येणार आहेत.या अदालतींचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

 

            अपर जिल्हाधिकारी हे  जिल्ह्यात एकूण चार ठिकाणी महसूल अदालती घेणार आहेत. यानुसार अमरावती येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालयात 7 ऑक्टोबर  आणि 9 डिसेंबर 2026 रोजी अमरावती,चांदूर रेल्वे,धामनगाव रेल्वे,नांदगाव खंडेश्वर,तिवसा आणि भातकुली तालुक्यांसाठी महसूल अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. अचलपूर  येथे उपविभागीय कार्यालयात 14 ऑक्टोबर  आणि  16 डिसेंबर 2026 रोजी अचलपूर,चांदूर बाजार, चिखलदरा, दर्यापूर ,अंजनगाव सुर्जी तालुक्यांसाठी महसूल अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

            धारणी  येथे उपविभागीय कार्यालयात 21 ऑक्टोबर  आणि  23 डिसेंबर 2026 दरम्यान  धारणी तालुक्यासाठी महसूल अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. मोर्शी  येथे उपविभागीय कार्यालयात 28 ऑक्टोबर  आणि  30 डिसेंबर 2026 दरम्यान  मोर्शी व वरुड तालुक्यांसाठी महसूल अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

            उपविभागीय अधिकारी हे 6 ऑक्टोबर  आणि 8 डिसेंबर 2026 रोजी जिल्ह्यात एकूण सात ठिकाणी महसूल अदालती घेणार आहेत. यानुसार अमरावती उपविभागीय कार्यालयात अमरावती तालुक्यासाठी ,अचलपूर उपविभागीय कार्यालयात अचलपूर आणि चांदूरबाजार तालुक्यांसाठी ,धारणी  उपविभागीय कार्यालयात धारणी आणि चिखलदरा तालुक्यांसाठी, मोर्शी उपविभागीय कार्यालयात  मोर्शी व वरुड तालुक्यांसाठी, दर्यापूर उपविभागीय कार्यालयात दर्यापूर आणि अंजनगाव सुर्जी तालुक्यांसाठी, भातकुली उपविभागीय कार्यालयात तिवसा आणि भातकुली तालुक्यांसाठी, चांदूररेल्वे उपविभागीय कार्यालयात चांदूररेल्वे,धामणगाव रेल्वे आणि  नांदगाव खंडेश्वर तालुक्यांसाठी महसूल अदालतींचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

             अमरावती,भातकुली,तिवसा,दर्यापूर,अंजनगाव सुर्जी,अचलपूर,चांदूरबाजार आणि मोर्शी तहसिलदार हे 13 ऑक्टोबर  आणि  15 डिसेंबर 2026 दरम्यान  महसूल अदालती घेणार आहेत.

 

          महसूल न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांमुळे पक्षकारांचा वेळ आणि पैसा मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. ही समस्या दूर करण्यासाठी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व मंडळ अधिकारी यांच्या स्तरावर हे अभियान राबवले जात आहे. प्रलंबित दाव्यांमधील दोन्ही पक्षकार तडजोड योजनेअंतर्गत अर्ज सादर करू शकतील. प्राप्त अर्जांनुसार महसूल लोक अदालतीचे आयोजन करून दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने प्रकरणांवर अंतिम निर्णय घेतला जाईल आणि ते कायमस्वरूपी निकाली काढले जातील.

 

               प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी एकाच दिवशी सकाळी 11 आणि दुपारी 3 वाजता अशा दोन सत्रांमध्ये या सुनवाणी घेण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील संबंधित पक्षकारांनी आपापल्या क्षेत्रातील प्रलंबित दाव्यांबाबत सकारात्मक भूमिका घेऊन तडजोड करावी. नागरिकांनी संबंधित कार्यालयांशी  संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages