महिलांची एकजूट, विवेकाचा जागर; बोराळ्यात महिला राजसत्ता आंदोलनाची गावशाखा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, September 11, 2026

महिलांची एकजूट, विवेकाचा जागर; बोराळ्यात महिला राजसत्ता आंदोलनाची गावशाखा



महिला सभेतून अंधश्रद्धा निर्मूलन व व्यसनमुक्तीचा संदेश



बोराळा, ता. चांदूर बाजार, दि. ६ सप्टेंबर २०२६ : महिलांनी गावातील प्रश्नांवर संघटितपणे पुढाकार घ्यावा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निर्णय प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा आणि सामाजिक परिवर्तनासाठी नेतृत्व करावे, या उद्देशाने बोराळा येथे महिला राजसत्ता आंदोलनाच्या गावशाखेची स्थापना करण्यात आली. यावेळी महिला सभा घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती आणि महिला नेतृत्वावर प्रबोधन करण्यात आले.


गावशाखेचे उद्घाटन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अमरावतीचे जिल्हा प्रधान सचिव विजय डवरे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत बोराळाच्या सरपंच तथा प्रशासक अनिता शिंगाडे होत्या. महिला राजसत्ता आंदोलनाच्या जिल्हा समन्वयक प्रतिभा खापरे आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रफुल्ल मंदा श्रीधर यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन केले. संविधान जागर अभियानाचे संजय खापरे उपस्थित होते.



महिला सभेत शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, रोजगार, महिला सुरक्षा तसेच गावातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. महिलांनी ग्रामपंचायतीच्या कामकाजात सक्रिय सहभाग घेऊन आपल्या समस्या संघटितपणे मांडाव्यात, असे आवाहन करण्यात आले.



अंधश्रद्धेमुळे निर्माण होणारी भीती, गैरसमज व शोषण दूर करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकवादी विचारांची गरज यावेळी स्पष्ट करण्यात आली. तसेच दारू, तंबाखू, गुटखा आदी व्यसनांचे कुटुंबावर होणारे दुष्परिणाम सांगून व्यसनमुक्तीसाठी महिलांनी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले.

गावशाखेची कार्यकारिणी


अध्यक्ष अनिता शिंगाडे, उपाध्यक्ष राजकन्या कुरवाडे, सचिव वर्षा सोळंके, कोषाध्यक्ष कमल फरतडे, तर गाव शाखा संघटिका सविता इंगोले आणि सहसंघटिका रेखा भोवते यांची निवड करण्यात आली.

नेतृत्वशील महिला म्हणून रंजना वाघमारे, चित्रा शेकार व अलका इंगोले यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली. सदस्य म्हणून सीमा पाटील, प्रतिभा शेळके, सत्यफुला इंगोले, अश्विनी शिंदे, सुनिता नांदणी, सीमा मेश्राम, रूपाली इंगोले व प्रीती खैरकर यांचा समावेश करण्यात आला.

कार्यक्रमाला गावातील महिला आणि बचत गटातील महिलांची बहुसंख्येने उपस्थिती होती. महिला नेतृत्वाला बळ देणे, अंधश्रद्धेविरोधात विवेकाचा जागर करणे आणि व्यसनमुक्तीसाठी जनजागृती करणे, या उद्देशाने आगामी काळात विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages