पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, September 11, 2026

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन


          


  मुंबई
, ११ :  गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि हातकागद संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात ‘Paint Your Own Paper Mache Bappa’ या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती रंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या कार्यशाळेला भेट देऊन हातकागदापासून तयार केलेल्या गणेशमूर्तीला नैसर्गिक रंगांनी रंगवित पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश दिला.

 

            या कार्यशाळेत हातकागदाच्या लगद्यापासून तयार केलेल्या गणेशमूर्तींना नागरिक आणि विद्यार्थ्यांनी नैसर्गिक रंगांच्या माध्यमातून आकर्षक रूप दिले. पर्यावरण संवर्धनासोबतच पारंपरिक हातकागद कलेचे जतन, स्थानिक कलांना प्रोत्साहन आणि ग्रामीण भागातील कारागिरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

 

            उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, शाश्वत व पर्यावरणपूरक पर्याय म्हणून महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने हातकागदाच्या लगद्यापासून (Paper Mache) गणेशमूर्ती तयार केल्या आहेत. या मूर्तींचे विसर्जन तुलनेने जलद होते आणि नैसर्गिक रंगांचा वापर करून त्यांना आकर्षक स्वरूप देता येते.

हातकागदाच्या गणेशमूर्तींच्या वापरामुळे पर्यावरणपूरक विसर्जनास चालना मिळण्यासोबतच नैसर्गिक रंगांचा वापर, पारंपरिक हातकागद कलेचे संवर्धन आणि स्थानिक कारागिरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होते. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळू शकते.

 

            उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, “गणेशोत्सव हा श्रद्धा, भक्ती आणि आनंदाचा उत्सव आहे. हा उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. गणेशमूर्तींसाठी पर्यावरणपूरक पर्यायांचा स्वीकार करण्यासोबतच स्थानिक कलाकार, कारागीर आणि पारंपरिक उद्योगांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.”

 

      “हातकागदापासून तयार केलेल्या गणेशमूर्तींचा वापर करून पर्यावरणाचे रक्षण करण्याबरोबरच स्थानिक कला आणि कारागिरांच्या कौशल्याला बाजारपेठ मिळवून देता येईल. ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा आणि हातकागदासह स्थानिक कलांना प्रोत्साहन द्या’, हा संदेश प्रत्येक नागरिकाने स्वीकारावा,” असे आवाहनही मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages