*लेझर लाईटवर बंदी, नियम मोडल्यास होणार कडक कारवाई
अमरावती, दि. ११ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहर पोलीस प्रशासनाने ध्वनी प्रदूषण आणि सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत कठोर पावले उचलली आहेत. शहरात गणेश विसर्जन व मिरवणुकांदरम्यान डीजे आणि बेन्जो चालकांसाठी कडक नियमावली लागू करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे तंतोतंत पालन करण्याचे स्पष्ट आदेश अमरावती पोलिसांनी दिले आहेत.
पोलीस आयुक्तालयाकडून राजापेठ पोलीस ठाणे आणि पोलीस आयुक्तालय येथे डीजे आणि बेन्जो चालक, मालक यांची बैठक पार पडली. या बैठकांना पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, शाम घुगे, पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत मिरवणुकीदरम्यान डोळ्यांना व आरोग्यास धोकादायक ठरणारे लेझर लाईट आणि प्लाझ्मा लाईट वापरण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली. तसेच वाद्य वाजवताना केवळ 'दोन बेस व दोन टॉप' लावण्याचीच परवानगी राहणार आहे. यामुळे लहान मुले, वृद्ध नागरिक आणि आजारी व्यक्तींना ध्वनी प्रदूषणाचा त्रास होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आणि ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डीजे व बेन्जो चालक, मालकांवर प्रचलित कायद्यानुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व डीजे आणि बेन्जो चालक, मालकांनी लेझर व प्लाझ्मा लाईट लावण्यात येऊ नये आणि दोन बेस-दोन टॉपच्या नियमाचे पालन करून सहकार्य करण्याचे मान्य केले.