‘आयुष्मान आरोग्य मंदिर’मधून सर्वंकष आरोग्य सेवा बळकट - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, September 7, 2026

‘आयुष्मान आरोग्य मंदिर’मधून सर्वंकष आरोग्य सेवा बळकट



 

*जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रशिक्षणाला सुरवात

 

अमरावती, दि.८ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): राज्यातील ‘आयुष्मान आरोग्य मंदिर’ येथे प्राथमिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी ‘सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवा’ प्रशिक्षण मोहीम राबवली जात आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. यातून सर्वकष आरोग्य सेवा बळकट करण्यावर भर दिला जात आहे.

 

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे यांच्या मार्गदर्शनाखाली उजळणी प्रशिक्षण घेण्यात येत आहे. ग्रामीण आणि तळागाळातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण, सक्षम आणि लोकाभिमुख आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशिक्षण होत आहे. दोन दिवसीय कार्यशाळेत आरोग्य कर्मचाऱ्यांना तांत्रिक आणि प्रात्यक्षिक शिक्षण दिले जात आहे. यामध्ये 13 प्रकारच्या विविध आरोग्य सेवा आणि 14 प्रकारच्या तपासण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येते. यात गरोदर मातेची काळजी, सुरक्षित प्रसूती आणि बालकांचे वेळेवर लसीकरण, किशोरवयीन मुला-मुलींच्या आरोग्य समस्या आणि समुपदेशन, क्षयरोग, मलेरिया, डेंग्यू व इतर साथीच्या आजारांवर नियंत्रण, मधुमेह, उच्च रक्तदाव आणि कर्करोग यांचे वेळेत निदान व व्यवस्थापन यासह मानसिक आरोग्य, वृद्धपकाळातील आरोग्य व उपशामक सेवा, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, डोळे-नाक-कान-घसा व मौखिक आरोग्य तसेच योग व आयुष पद्धतींचा समावेश आहे.

 

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा प्रशिक्षण केंद्र आणि रुग्णालय प्रशिक्षण केंद्र येथील तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत हे प्रशिक्षण दिले जात आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, सहाय्यिका, आरोग्य सेवक, सेविका, आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक सहभागी झाले आहेत. तालुका आरोग्य अधिकारी आणि टीमच्या नियोजनामुळे या प्रशिक्षणाचा फायदा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी होणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे यांनी सांगितले.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages