व्यसनाधीनतेविरुद्ध लढा राष्ट्रव्यापी करणे आवश्यक : राज्यपाल जिष्णु देव वर्मा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Saturday, September 19, 2026

व्यसनाधीनतेविरुद्ध लढा राष्ट्रव्यापी करणे आवश्यक : राज्यपाल जिष्णु देव वर्मा




·        
ड्रग इज नॉट कुल, इट्स क्रुएल

 

            मुंबई, दि. १९ : अंमली पदार्थ घेऊन जगणे हे काही जीवन नाही.  'ड्रग इज नॉट कुल, इट्स क्रुएल'. व्यसनाधीन व्यक्तीला मदत करणे म्हणजे त्याच्या जीवनात लुडबुड करणे असे नसून ती त्याला मदत करणे आहे. व्यसनाधीन व्यक्तीशी आपला संबंध नाही; सबब त्याला वाटते तसे जगू द्यावे, अशी स्वार्थी भूमिका घेऊ नये असे  सांगताना अंमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला मदत करण्यासाठी युवक व विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. व्यसनाधीनतेचे गंभीर आवाहन विचारात घेता त्याविरुद्ध लढा राष्ट्रव्यापी करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.


 

            पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरु असलेल्या सेवा संकल्प अभियानांतर्गत राज्यपालांनी एचएसएनसी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना व्यसन मुक्तीची प्रतिज्ञा दिली, त्यावेळी ते बोलत होते.  


 

            के. सी. महाविद्यालयाचे सभागृह तसेच ओव्हल मैदान येथे झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी हात उंचावून व्यसनमुक्तीची तसेच व्यसनमुक्त भारताच्या निर्मितीसाठी आपले योगदान देण्याची प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमाचे आयोजन एचएसएनसी विद्यापीठाने पंडित दीनदयाल उपाध्याय सेवाभावी ट्रस्ट, नांदेड व  मेघाश्रय फाउंडेशन यांच्या सहकार्याने केले होते. 


 

            समाजातील वाढत्या अंमली पदार्थाच्या व्यसनाधीनतेच्या समस्येला मागणी व पुरवठा अशा दोन बाजू आहेत. पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस व इतर शासकीय यंत्रणा कार्य करीत आहेत. परंतु मागणी होऊ नये याकरिता समाजात मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक असल्याचे राज्यपालांनी सांगितले. 

 

            भारत ही सर्वाधिक युवा शक्ती असलेली सर्वात जुनी संस्कृती आहे.  अंमली पदार्थांच्या आव्हानामुळे आज कुटुंब  व समाज उद्ध्वस्त होत आहे. पूर्वी असलेली संयुक्त कुटुंब पद्धती राहिली नाही. त्यामुळे व्यसनाधीन व्यक्तीला आधार देणारी नवी व्यवस्था समाजाला निर्माण करावी लागेल असे राज्यपालांनी सांगितले.  

 

            यावेळी राज्यपालांच्या हस्ते मुंबई विद्यापीठाने विकसित केलेल्या 'से नो टू ड्रग्स' या पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. या पोर्टलच्या माध्यमातून व्यसन मुक्ती संकल्प घेता येणार आहे तसेच त्या विषयावर जनजागृती केली जाणार आहे.

 

            एचएसएनसी विद्यापीठाचे प्रमुख व ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अनिल हरीश यांनी यावेळी प्रत्यक्ष घडलेल्या उदाहरणातून व्यसनाधीनता व्यक्ती व कुटुंबाचे जीवन कसे संपवते हे सांगितले.

 

            कार्यक्रमाला राज्यपालांचे सहसचिव एस रामामूर्ती, के सी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या तेजश्री शानबाग, मेघाश्रेय फाउंडेशनच्या अध्यक्ष सीमा सिंह, पंडित दीनदयाल उपाध्याय सेवाभावी ट्रस्टचे विश्वस्त डॉ. सुमेध चव्हाण, अभिनेते रवी दुबे व एचएसएनसी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ भगवान बालानी उपस्थित होते.     


 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages