योजनेचा लाभ देण्यासाठी सहकार विभाग व बँकानी समन्वयाने कामे करून कामाला गती द्या – जिल्हाधिकारी आशिष येरेकर - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, August 6, 2026

योजनेचा लाभ देण्यासाठी सहकार विभाग व बँकानी समन्वयाने कामे करून कामाला गती द्या – जिल्हाधिकारी आशिष येरेकर



   
         जिल्ह्यातील सहायक निबंधक आणि बँकांचा घेतला आढावा

अमरावती,दि.६ : जिल्ह्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर झाली असून शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी सर्व तालुका स्तरावरील सहायक निबंधकांनी केवायसी शिल्लक असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी दररोज उपलब्ध करून देत कामाला गती द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आज आढावा बैठकीत दिल्या.

        जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल सभागृहात जिल्हाधिकारी श्री येरेकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व तालुक्यांतील सहायक निबंधक आणि बँकाच्या प्रतिनिधींची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. याबैठकीत त्यांनी या सूचना केल्या. निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे,  जिल्हा उपनिबंधक राजेश भुयार आदी उपस्थित होते.

            राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती या ऐतिहासिक योजनेंतर्गत सहकार विभागामार्फत जिल्ह्यातील १ लाख २४ हजार १४२ शेतकऱ्यांची यादी शासनाच्या महाआयटी पोर्टलवर भरण्यात आली. २५ जुलै २०२६ रोजी जिल्ह्यातील ७६ हजार ९७६ पात्र शेतकऱ्यांची पहिली  यादी प्रसिद्ध करण्यात आली असून आतापर्यंत यापैकी ४६ हजार ४२१ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले आहे. कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रावर (सेतु) आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे. ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण शिल्लक आहे अशा शेतकऱ्यांची दररोज यादी तयार करून ती बँकांकडे पाठवावी व बँकानी संबंधित शेतकऱ्यांशी संपर्क करून ही प्रक्रिया पूर्ण करावी अशा सूचना श्री येरेकर यांनी दिल्या. तसेच ज्या शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक नोंदणी शिल्लक आहे त्यांची यादी  संबंधित तहसिल कार्यालयाला देवून नोंदणी करून घेत या कामास गती देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या कामास प्राधान्य देवून सार्वजनिक सुटीच्या दिवशीही सेतु केंद्र आणि बँका सुरु ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.



Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages