मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहिल्या यादीनुसार राज्यातील ६ लाखांवर पात्र शेतकऱ्यांना ५ हजार कोंटीचा लाभ वितरीत
अमरावती जिल्ह्यातील ३३ हजार ४०१पात्र शेतकऱ्यांना ३०८ कोटींवर कर्जमाफी
अमरावती, दि.८ : राज्य शासनाच्या ऐतिहासिक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्ग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज राज्यातील ६ लाख २२ हजार पात्र शेतकऱ्यांना ५ हजार २९ कोटींचा लाभ वितरीत करण्यात आला. याअंतर्गत अमरावती जिल्ह्यातील ३३ हजार ४०१ पात्र शेतकऱ्यांना ३०८ कोटी १६ लाख २७ हजार २८ रुपयांच्या लाभाचे वितरण करण्यात आले.
मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहामध्ये मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६' या योजनेच्या उच्चस्तरीय आढावा बैठकीनंतर पात्र शेतकऱ्यांना लाभाचे वितरण करण्यात आले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार,सहकार मंत्री बाबासाहेब पाटील,कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन,पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, पर्यटन मंत्री शंभुराज देसाई, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे,सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल,मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, सहकार आयुक्त दीपक तावरे उपस्थित होते. या बैठकीस सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, सहकारी संस्थांचे निबंधक दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.
राज्यातील शेतकऱ्यांना नव्याने शेतीसाठी आर्थिक बळ देण्याच्यादृष्टीने राज्य शासनाने सर्व बँकांना कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना तातडीने खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. पहिल्या यादीतील ज्या पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही, त्यांचे प्रमाणीकरण पूर्ण होताच त्यांच्या कर्जखात्यांवरही लाभाची रक्कम टप्प्याटप्प्याने हस्तांतरित करण्यात येणार आहे
0 Comments