दि. १९ शिरजगाव कसबा :- ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क
ग्रामीण भागातील अनेक गरीब आणि गरजू नागरिकांचे नाव ग्रामपंचायतीच्या घरकुल यादीत समाविष्ट नसल्याचे समोर येत आहे. मात्र, यामुळे हताश न होता नागरिक थेट नवीन अर्ज किंवा हरकत नोंदवून आपले नाव यादीत समाविष्ट करू शकतात. सध्या आवास प्लस (Awas Plus) योजनेची नवीन यादी तपासणे आणि नवीन अर्ज करण्याची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू आहे.
यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नागरिकांनी खालील ४ महत्त्वाच्या टप्प्यांचे पालन करणे आवश्यक आहे:
१. ग्रामपंचायत कार्यालयात नवीन अर्ज करा
पात्रता: ज्यांचे घर सध्या पडके, कच्चे, किंवा किंबा पत्र्याचे जीर्ण अवस्थेत आहे आणि जे घरकुल योजनेच्या निकषांमध्ये बसतात, ते सर्व नागरिक नवीन अर्जासाठी पात्र आहेत.
नागरिकांनी आपल्या गावच्या ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन 'आवास प्लस' अंतर्गत नाव नोंदणीसाठी किंवा आधीच्या नावावर हरकत घेण्यासाठी रीतसर अर्ज भरून देणे गरजेचे आहे.
आवश्यक कागदपत्रे जमा करा
अर्ज करताना ग्रामसेवकाकडे खालील कागदपत्रे सादर करणे अनिवार्य आहे:
- आधार कार्ड (कुटुंबातील सर्व सदस्यांचे)
- रेशन कार्ड
- ७/१२ आणि ८-अ चा उतारा किंवा जागेची मालकी असल्याचा पुरावा
- उत्पन्नाचा दाखला
- कच्च्या/पडक्या घराचा थेट फोटो
- बँक पासबुकची झेरॉक्स
ग्रामसभेत नाव मंजुरीसाठी प्रयत्न करा
नवीन अर्ज सादर केल्यानंतर ग्रामपंचायतीमार्फत त्याची प्रत्यक्ष पडताळणी केली जाते.
त्यानंतर होणाऱ्या अधिकृत ग्रामसभेमध्ये तुमच्या अर्जावर चर्चा केली जाईल. तुमचे नाव लाभासाठी पात्र ठरवून अंतिम यादीत समाविष्ट करण्यासाठी ग्रामसभेचा ठराव मंजूर करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
ग्रामपंचायतीने दखल न घेतल्यास पंचायत समितीकडे दाद मागा
जर ग्रामपंचायत स्तरावर तुमच्या अर्जाची दखल घेतली गेली नाही किंवा टाळाटाळ झाली, तर निराश न होता आवश्यक कागदपत्रांसह तालुक्याच्या पंचायत समिती कार्यालयात (गट विकास अधिकारी - BDO) यांच्याकडे लेखी तक्रार किंवा थेट अर्ज दाखल करता येऊ शकतो.
तुमच्या गावाची घरकुल यादी सध्या ऑनलाईन उपलब्ध नसून फक्त ग्रामपंचायतीमध्येच पाहायला मिळेल. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता, त्वरित आपल्या गावच्या ग्रामसेवांकाशी थेट संपर्क साधावा आणि आपले नाव तपासून घ्यावे.