*अमरावती समिती कार्यालय सुट्टीच्या दिवशीही राहणार सुरू
अमरावती, दि. ३१ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : जात वैधता प्रमाणपत्रातील अद्याप त्रुटींची पूर्तता केली नसेल अशा विद्यार्थ्यांना त्रुटींची पूर्तता करण्याचे आवाहन करत प्रवेशापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, अमरावती कार्यालय शनिवार 29 आणि रविवार 30 ऑगस्ट 2026 या सुट्टीच्या दिवशीही पूर्णवेळ सुरू ठेवण्यात आले आहे.
शैक्षणिक वर्ष 2026-27 मधील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या (उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण, कृषी, वैद्यकीय, आयुष आणि कला शिक्षण) प्रवेश प्रक्रियेसाठी राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक विद्यार्थ्यांनी अद्याप त्रुटींची पूर्तता केलेली नाही. या विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी कार्यालय सुट्टीच्या दिवशीही पूर्णवेळ सुरू ठेवण्यात आले आहे.
अनेक विद्यार्थ्यांनी उशिराने अर्ज सादर केले आहेत. पात्र विद्यार्थ्यांच्या अर्जांमधील त्रुटींबाबत समितीने वेळोवेळी एसएमएस, ई-मेल आणि पत्राद्वारे कळवले असूनही अनेक विद्यार्थ्यांनी अद्याप कार्यालयाशी संपर्क साधलेला नाही.अर्जदारांची जबाबदारी प्रवेशाच्या तारखा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) जाहीर करण्यात आल्या आहेत. वेळेत प्रमाणपत्र न मिळाल्यास होणाऱ्या नुकसानीला अर्जदार स्वतः जबाबदार राहतील. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आणि समितीला वेळेत निर्णय घेता यावा, यासाठी संबंधित विद्यार्थ्यांनी त्वरित अमरावती समिती कार्यालयाशी संपर्क साधून त्रुटींची पूर्तता करावी, असे आवाहन समितीच्या श्रीमती बोबडे यांनी केले आहे.