अमरावती, दि.३१ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : जिल्हा स्त्री रुग्णालयात इंधन उपलब्ध असतानाही रुग्णाला रुग्णवाहिका देण्यास नकार दिल्याचा आरोप फेटाळत रुग्णालय प्रशासनाने यासंदर्भातील वृत्त पूर्णपणे तथ्यहीन आणि दिशाभूल करणारे असल्याचे स्पष्ट केले आहे. 30 ऑगस्ट 2026 रोजी दैनिक वृत्तपत्र आणि सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या बातम्यांनंतर जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी या प्रकरणी सविस्तर खुलासा सादर केला आहे.
आमदार चित्रा वाघ या दि. 29 ऑगस्ट रोजी रुग्णालयाच्या भेटीवर आल्या होत्या. त्याचवेळी रीना रमेश उईके (रा. माहुल जहांगीर) या डिस्चार्ज दिलेल्या रुग्णाला घरी सोडण्यासाठी रुग्णवाहिकेची वाट पाहावी लागत होती. यापूर्वीची रुग्णवाहिका दुसऱ्या रोशनी हरीष शिंगणे (रा. नांदगाव खंडेश्वर) यांना पीडीएमसी रुग्णालयात सोडण्यासाठी गेली होती. ती रुग्णवाहिका परत येण्यासाठी केवळ 15 ते 20 मिनिटांचा वेळ असल्याने डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णाला थोडा वेळ थांबण्यास सांगण्यात आले होते. मात्र, रुग्णवाहिकेत इंधनच नसल्यामुळे रुग्णाला थांबवून ठेवल्याचा आरोप या दरम्यान करण्यात आला.
आमदार चित्रा वाघ यांनी रुग्णाकडे चौकशी केली असता, त्यांनी 5 ते 10 मिनिटांपासून वाट पाहत असल्याचे सांगितले. त्यावेळेस रुग्णालयात उभी असलेली कंत्राटी रुग्णवाहिका आणि तिचा चालक वॉर्डातील इतर रुग्णांना आणण्यासाठी गेले होते. त्यानंतर लगेचच उपलब्ध कंत्राटी रुग्णवाहिकेतून रुग्णाला त्यांच्या गावी रवाना करण्यात आले.
सामान्य रुग्णालय, अमरावती अंतर्गत 108 आणि 102 क्रमांकाच्या एकूण 48 रुग्णवाहिका चोवीस तास उपलब्ध असतात. यापैकी 4 रुग्णवाहिका जिल्हा स्त्री रुग्णालयाला देण्यात आलेल्या आहेत. सर्व 4 रुग्णवाहिका सुस्थितीत असून त्यामध्ये पुरेसे इंधन उपलब्ध होते. यातील 2 रुग्णवाहिका मेळघाट भागातील रुग्णांसाठी, तर 2 रुग्णवाहिका स्थानिक सेवेसाठी कार्यरत आहेत. घटनेच्या वेळी या चारही रुग्णवाहिका इतर रुग्णांना पोहोचवण्यासाठी बाहेर गेल्या होत्या.