महिला राजसत्ता आंदोलनाच्या गावशाखेचा दिमाखदार शुभारंभ; अंधश्रद्धेविरोधात विवेकाचा जागर
पुजदा, ता. जि. अमरावती, दि. ३१ ऑगस्ट २०२६ : “सांदी-कोपऱ्यात राहायचं नाही, राज्य करायला भ्यायचं नाही!” आणि “विवेकाचा आवाज बुलंद करूया!” अशा जोशपूर्ण घोषणांनी पुजदा गाव दुमदुमून गेले. महिलांचे नेतृत्व, राजकीय सहभाग आणि सामाजिक परिवर्तनाची दिशा निश्चित करणाऱ्या महिला राजसत्ता आंदोलनाच्या पुजदा गावशाखेचा फलक उद्घाटन सोहळा, महिलांसाठी राजसत्ता आंदोलनाची कार्यशाळा आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.गावाच्या मुख्य रस्त्यालगत महिला राजसत्ता आंदोलनाच्या गावशाखेच्या फलकाचे उद्घाटन सरपंच उज्वलभाऊ दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा प्रधान सचिव विजय डवरे, महिला राजसत्ता आंदोलनाच्या जिल्हा समन्वयक प्रतिभा खापरे यांच्यासह गावशाखेतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
महिलांच्या राजकीय-सामाजिक नेतृत्वाला बळ
फलक उद्घाटनानंतर ग्रामपंचायत कार्यालयात महिलांसाठी विशेष कार्यशाळा घेण्यात आली. महिला राजसत्ता आंदोलनाची पार्श्वभूमी, सुरुवात, उद्दिष्टे, कार्यपद्धती तसेच गावशाखेची जबाबदारी, महिलांची भूमिका आणि गावपातळीवर संघटितपणे काम करण्याच्या पद्धती याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
महिलांनी केवळ घर आणि कुटुंबापुरते मर्यादित न राहता गावाच्या विकासाच्या निर्णय प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपले नेतृत्व प्रभावीपणे उभे करावे आणि सामाजिक प्रश्नांवर संघटितपणे आवाज उठवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
अंधश्रद्धेविरोधात महिलांची निर्णायक भूमिका
याच कार्यक्रमात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची भूमिका व कार्य याबाबत महिलांना माहिती देण्यात आली. अंधश्रद्धा, रूढी-परंपरा आणि अवैज्ञानिक समजुतींविरोधात वैज्ञानिक दृष्टिकोन व विवेकाची भूमिका मांडण्यात आली. समितीची पंचसूत्री महिलांना समजावून सांगण्यात आली.
महिलांनी अंधश्रद्धेविरोधातील लढ्यात पुढाकार घेतला तर कुटुंबापासून समाजापर्यंत विवेकवादी वातावरण निर्माण होऊ शकते, यावरही यावेळी भर देण्यात आला. महिला राजसत्ता आंदोलन आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शाखांनी भविष्यात संयुक्तपणे जनजागृतीपर कार्यक्रम, महिला प्रबोधन, संविधान जागर आणि विवेकवादी उपक्रम राबविण्याबाबतही चर्चा करण्यात आली.
पुजदा गावशाखेची कार्यकारिणी जाहीर
कार्यक्रमात महिला राजसत्ता आंदोलनाच्या पुजदा गावशाखेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्ष अनुराधा गोफने, उपाध्यक्ष सुषमा रहाटे, सचिव शीतल शिंदे, कोषाध्यक्ष प्रिया इंगळे, नेतृत्वशील महिला वर्षा भुजाडे, संघटिका प्रणिता वानखडे आणि सहसंघटिका सविता नागदिवे यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली.
सदस्य म्हणून अपर्णा झाडे, पूनम चोरे, उषा काकडे, नाजमीन अशफाक अली, अंजुम बानो शेख शादिक, वाहिद अंजुम साजिद मुल्ला, रुकसाना इरफानोद्दीन आणि हीना अफसर अली यांचा समावेश करण्यात आला.
यावेळी पुजदा गावातील बचत गटातील महिला तसेच समुदाय संसाधन व्यक्तींचीही लक्षणीय उपस्थिती होती.
पुस्तक व दशसूत्रीच्या माध्यमातून वैचारिक जागर
कार्यक्रमात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अमरावती व संविधान जागर अभियानाच्या वतीने महिलांना ‘शिवाजी महाराज’ हे पुस्तक देण्यात आले. तसेच संविधान जागर अभियानाच्या वतीने संत गाडगेबाबांची दशसूत्री असलेली पत्रके महिलांना वितरित करण्यात आली. वैचारिक प्रबोधन आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश या माध्यमातून देण्यात आला.
मान्यवरांचा सन्मान
गावातील नेतृत्वशील महिला तसेच उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ आणि महिला राजसत्ता आंदोलनाचा दुपट्टा देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच उज्वल दळवी होते. प्रमुख उपस्थितीत उपसरपंच अरुणभाऊ शिंदे, प्रशासक सदस्य अपर्णा झाडे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अमरावतीचे जिल्हा प्रधान सचिव विजय डवरे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रफुल्ल मंदा श्रीधर, संजय खापरे, महा. अनिस पुजदा शाखेचे कार्याध्यक्ष राहुल वाघमारे, महा. अनिस देवरा शाखेचे कार्याध्यक्ष सौरभ देशमुख आणि महिला राजसत्ता आंदोलनाच्या जिल्हा समन्वयक प्रतिभा खापरे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रभावी संचालन प्रतिभा खापरे यांनी केले. राहुल वाघमारे यांनी उपस्थितांचा परिचय करून दिला, तर सुषमा रहाटे यांनी आभार मानले.
घोषणांनी दुमदुमला पुजदा
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी महिलांनी जोशपूर्ण घोषणा देत वातावरणात नवचैतन्य निर्माण केले. “महिला राजसत्ता आंदोलनाचा विजय असो!”, “आम्ही सख्या नाही पण पक्क्या बहिणी!”, “आमचा पत्ता राजसत्ता!”, “सांदी-कोपऱ्यात राहायचं नाही, राज्य करायला भ्यायचं नाही!”, “विवेकाचा आवाज बुलंद करूया!” अशा घोषणांनी कार्यक्रमाचा उत्साह शिगेला पोहोचला.
महिलांचे संघटन, महिलांचे नेतृत्व, अंधश्रद्धेविरोधात विवेकाचा जागर आणि संविधानिक मूल्यांवर आधारित समाजनिर्मितीचा निर्धार करत पुजदा येथील कार्यक्रमाची सांगता झाली. महिला राजसत्ता आंदोलनाच्या गावशाखेच्या स्थापनेमुळे पुजदा परिसरातील महिलांच्या सामाजिक व सार्वजनिक सहभागाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.