काळरात्र, नदीचे रौद्र रूप अन् 'देवदूतांचे' आगमन! - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, August 5, 2026

काळरात्र, नदीचे रौद्र रूप अन् 'देवदूतांचे' आगमन!

 

जिल्हा शोध व बचाव पथकाच्या साहसी शौर्याची थरारक कहाणी

*एकाच रात्री दोन आव्हानांचा यशस्वी मुकाबला

अमरावती, दि. ६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): ज्यावेळी चारी बाजूंनी मृत्यूचे थैमान सुरू असते, नद्यांचे रौद्ररूप मानवी वस्त्या कवेत घेण्यासाठी घोंगावत असते आणि काळोख्या रात्रीत आशेचा शेवटचा किरणही मावळत आलेला असतो; नेमक्या त्याच क्षणी स्वतःचा जीव मुठीत धरून मदतीला धावून येतात ते जिल्हाधिकारी कार्यालयाचे शोध व बचाव पथक!

30 जुलै 2026 च्या भयाण रात्री जिल्ह्यातील संग्रामपूर आणि राजुरा या दोन वेगवेगळ्या ठिकाणी निसर्गाच्या कोपाने 16 निष्पाप जिवांचा श्वास रोखून धरला होता. परंतु  जिल्हा प्रशासनाचे नियोजन आणि रेस्क्यू टीमच्या शौर्यामुळे 16 जणांना मृत्यूच्या दाढेतून ओढून नवीन आयुष्य मिळवून देण्यात आले.

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील संग्रामपूर येथे छतावर ताटकळलेल्या 9 जिवांना पुराचा वेढा घातला होता. गावालगत वाहणाऱ्या बेंबळा नदीने 30 जुलै रोजी रात्री भयानक रूप धारण केले. मुसळधार पावसामुळे नदीचे पाणी काही क्षणातच गावात घुसले. रात्री 11 वाजेच्या सुमारास पूर अचानक वाढल्याने गावातील नागरिक घरात अडकले आणि प्राण वाचवण्यासाठी त्यांनी छताचा आसरा घेतला. चारही बाजूंनी वेगाने वाहणारे पाण्याचे लोट आणि सतत वाढणारी पाण्याची पातळी अशा स्थितीत मृत्यूशी झुंज देणाऱ्या 9 नागरिकांच्या नजरा केवळ मदतीच्या आशेने अंधाराकडे लागल्या होत्या.

ही माहिती मिळताच जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षात चक्रे वेगाने फिरली. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या तात्काळ आदेशाने, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांच्या थेट मार्गदर्शनाखाली रेस्क्यू टीम रात्री 12.10 वाजता सर्व साहित्यानिशी घटनास्थळी पोहोचली.

छतावर अडकलेली माणसे खाली अथांग पसरलेला पुराच्या पाण्याचा अक्राळविक्राळ पसारा पाहून अक्षरशः थरथर कापत होती. पण जेव्हा अंधारात रेस्क्यू टीमच्या टॉर्चचा प्रकाश आणि बोटीचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचला, तेव्हा 'आपण वाचलो' या भावनेने त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले.

रात्रीची वेळ, अंधार आणि पाण्याचा तुफान वेग यामुळे बोट चालवण्यात प्रचंड अडचणी येत होत्या. परंतु पथकातील सदस्यांनी अत्यंत धैर्याने व शांतपणे नागरिकांना धीर दिला. वयस्कर व्यक्ती आणि लहान मुलांना प्रथम प्राधान्य देत, एकापाठोपाठ  9 जणांना सुरक्षित बोटीत बसवून पाण्याच्या तावडीतून बाहेर काढले व प्रशासनाच्या स्वाधीन केले. हनुमंत उके (वय 34), रवी मेश्राम (वय 38), सुभाष भोईर (वय 40), सतीश मारभते (वय 28), आशिष उके (वय 18), गौरव मारबले (वय 22), ओम गिरी (वय 18), अमोल भोयर (वय 29), अनिकेत केवट (वय 25) यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

या मोहिमेत विशाल निमकर, कौस्तुभ वैद्य, पी. एस. गायकवाड, गणेश कायदेकर, सुरज ठाकूर, दीपक भोईटे, मनीष उताणे, गोकुळ मुंडे यांचा समावेश होता.

राजुरा येथील मोखड नदीमध्ये बचाव पथकाने सापांचा सामना करून 2 वर्षांच्या चिमुकल्याला सुखरूप वाचविले. रात्री 8.35 वाजल्याच्या सुमारास राजुरा येथील मोखड नदीच्या पुरामध्ये 7 जण अडकल्याची नियंत्रण कक्षाला मिळाली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दुसरे आपत्ती व्यवस्थापन पथक रात्री 9:20 वाजता घटनास्थळी तातडीने दाखल झाले. येथील परिस्थिती अत्यंत आव्हानात्मक आणि भीतीदायक होती. काळोख्या अंधारात नदीच्या तुफान प्रवाहात लाकडाचे मोठे दांडके, झाडेझुडपे आणि पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून आलेले विषारी साप फिरत होते. अशा मृत्यूच्या छायेत पथकातील गोताखोरांनी जराही विलंब न करता रबर बोट पाण्यात उतरवली. पाण्याच्या तावडीत अडकलेल्या या 7 जणांमध्ये 4 महिला, 2 पुरुष आणि अवघ्या 2 वर्षांचे बाळ होते.

स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता, विषारी साप आणि तरंगत्या लाकडाच्या अडथळ्याना भेदत पथकाने अवघ्या 30 मिनिटांत मोखड नदीच्या पात्रातून 7 जणाना सुखरूप बाहेर काढले. जेव्हा 2 वर्षांच्या चिमुकल्या अनन्याला रेस्क्यू टीमने बोटीतून सुरक्षित जमिनीवर आणले, तेव्हा उपस्थिताच्या छातीतील ठोका चुकवणारा काळजीचा क्षण संपून सर्वांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे भाव तरळले.

मोखड नदीच्या पुरातून साहेबराव जाधव, सावित्री जाधव, पूनम जाधव, जेतालाल जाधव, अनन्या जाधव (वय 2 वर्षे), सोनम जाधव, रीना जाधव यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. राजुरा मोहिमेतील सचिन धरमकर, आकाश निमकर, मुकेश सदाशिव, सचिन पवार, चैतन्य पोहाणे, प्रफुल भुसारी, अजय आसोले, आपदा मित्र तुळशीराम गोडाणे, भूषण काळे यांचा समावेश होता.

या दोन्ही थरारक शोधकार्यादरम्यान महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचे अत्यंत मोलाचे सहकार्य लाभले. रात्रीच्या वेळी पार पडलेले हे रेस्क्यू ऑपरेशन पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. निसर्गाच्या भीषण कोपापुढे जेव्हा सामान्य माणूस हतबल होतो, तेव्हा स्वतःचा जीव धोक्यात घालून निष्पाप जिवांचे रक्षण करणाऱ्या अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शोध व बचाव पथकातील या 'रक्षक देवदूतांचे' सर्वत्र कौतुक होत आहे.



Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages