जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून वकिलांसाठी 40 तासांचे प्रशिक्षण - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, August 11, 2026

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून वकिलांसाठी 40 तासांचे प्रशिक्षण

 





जिल्हयातील 47 वकिलांचा सहभाग

अमरावती, दि.११ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अमरावती यांच्या वतीने वकिलांसाठी  7 ते  11 ऑगस्ट  2026 या कालावधीत 40 तासांचे मध्यस्थी प्रशिक्षण  जिल्हा व सत्र न्यायालय, अमरावती येथे सुरु आहे.

             अमरावती जिल्हयातील एकूण 47 वकील प्रशिक्षण घेत असून त्याचा फायदा पक्षकारांना व न्यायालयाला होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ अधिवक्ता प्रथमेश  पोपट, न्यायाधीश वरिष्ठ स्तर, बेलापुर, ठाणे सी. एन. ऑडरे यांच्या मार्फत प्रशिक्षणार्थी वकिलांना मध्यस्थीचे 40 तासांचे सखोल प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षणामध्ये प्रत्यक्ष उदाहरणे, चर्चासत्रे, प्रश्नोत्तर सत्र, तसेच ध्यान, प्रत्यक्ष मध्यस्थी सत्र अनुकरणाचा समावेश करण्यात आला आहे.

या प्रशिक्षणात वकिलांना मध्यस्थी प्रक्रियेबाबत सैद्धांतिक तसेच व्यावहारिक प्रशिक्षण देण्यात येत आहे. मध्यस्थीची संकल्पना व महत्त्व, मध्यस्थाची भूमिका व जबाबदाऱ्या, पक्षकारांशी प्रभावी संवाद, वाटाघाटीची कौशल्ये, विवाद निराकरणाच्या विविध पद्धती, मध्यस्थीची प्रक्रिया तसेच मध्यस्थीतील व्यावहारिक बाबी याबाबत प्रशिक्षण देण्यात येत आहे. 

तत्पूर्वी, 7 ऑगस्ट रोजी या प्रशिक्षणाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष न्या. उज्वला एम. नंदेश्वर होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संजय सहारे यांनी केले. जिल्हा न्यायाधीश- 1 ए. जी. जोशी,. अमरावती, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, के. आर. राजपुत, अमरावती  जिल्हा वकील संघाचे  अध्यक्ष प्रशांत देशमुख आदी उपस्थिती होते.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages