दि. २ चांदूर बाजार:
राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत (एमएसआयडीसी) सुरू असलेल्या खरपी-मोझरी रस्त्याच्या बांधकामाने शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी भर घातली आहे. जुन्या रस्त्यालगतची नाली बुजविण्याचे काम झाल्याने शिरजगाव कसबा येथील (गट क्र. ११/४७, भाग १) परिसरातील सुमारे ४० एकर शेती पाण्याखाली गेली आहे. यामुळे केळी, कपाशीसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले असून राठी शाळेचे क्रीडांगणही जलमय झाले आहे.

या प्रकारामुळे राधेश्याम रामदास आवारे, सतीश मते आणि देवेंद्र सातपुते यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पाण्याचा नैसर्गिक निचरा पूर्णपणे बंद झाला आहे. पावसाचे पाणी शेतात साचल्याने उभ्या पिकांचे नुकसान होत आहे. रस्त्याचे काम सुरू असताना पाण्याचा निचरा करण्याची कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यात न आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
या कामाचा जबाबदार अधिकारी आणि कंत्राटदार नेमका कोण आहे, याबाबत स्थानिकांना कोणतीही माहिती दिली जात नाही. यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, ब्राह्मणवाडा थडी येथील मुख्य रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून चिखल साचल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. यापूर्वी अनेक किरकोळ अपघात होऊनही कंत्राटदारावर कोणतीही कारवाई झालेली नाही. तसेच, दलालपूर येथील रस्त्याच्या एका बाजूला जीवघेणा खोल खड्डा पडला आहे. शाळा सुरू झाल्याने विद्यार्थी आणि नागरिकांची वर्दळ वाढली असून मोठ्या अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. कामाच्या सुमार दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत असतानाही प्रशासन आणि संबंधित यंत्रणा मौन बाळगून असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.