आज काल अनेक मुलींच्या तोंडी एक वाक्य हमखास ऐकायला मिळतं "लग्ना" साठी चांगला मुलगा मिळत नाही.हे वाक्य ऐकलं की माझ्या पण मनात प्रश्न उभा राहतो.की,मग मुलीं "बॉय-फ्रेंड" निवडतांना हाच विचार का करीत नाही...??
कॉलेज पासून ऑफिस पर्यंत,बस स्टॉप पासून सोशल मीडिया पर्यंत,मित्र शोधण्याची प्रक्रिया मुला-मुलीं कडुन वेगाने चालू असते."फेस बुक वर फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली जाते,इंस्टाग्राम वर लाईक्स ची देवाण घेवाण होते,व्हॉट्सऍप वर गुड मॉर्निंगची फुले उमलतात आणि मग चॅटिंग करता करता काहीच दिवसांत "बॉय फ्रेंड" पर्यंत मजल जातो.तेव्हा कुणी उंची मोजत नाही,पगाराची स्लिप मागत नाही,बँक बॅलन्स तपासत नाही,मुलाचे स्वतःचं घर आहे का...??या विषयी चौकशी करत नाही.पण ज्या वेळी लग्नाचा विषय निघतो ना..तेव्हा मात्र अचानक वरील सर्व निकष पाहिल्या जातात.मुलगा उंच हवा,पगार मोठा हवा,स्वतःचं घर हवं,चार चाकी हवी,सवयी चांगल्या हव्यात,व्यसन नसावं,सासू-सासरे समजूतदार हवेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलगा देखणा हवा.थोडक्यात सांगायचं तर, "बॉय फ्रेंड" साठी मन चालतं आणि नवऱ्या साठी गणित चालत.
"बॉय फ्रेंड" निवडताना अनेकदा वर्तमान पाहिलं जातं,तर नवरा निवडताना भविष्याचे स्वप्न पाहिलं जातं.म्हणूनच प्रेमा साठी योग्य वाटणारी व्यक्ती आयुष्यभराच्या सहजीवना साठी योग्य वाटेलच असं नाही.
आजची खरी समस्या "चांगला नवरा मिळत नाही" ही नसून "परिपूर्ण नवरा शोधण्याचा अट्टाहास" आहे.कारण परिपूर्ण माणूस या जगात कुठेच मिळणार नाही.प्रत्येका मध्ये काही गुण असतात,मात्र काही उणिवा पण असतात.संसार हा गुणांच्या प्रदर्शना वर चालत नाही,तर उणिवांच्या स्वीकारावर चालतो.
कधी कधी मुली म्हणतात की चांगले मुले मिळत नाहीत,त्यांनी स्वतःलाही एक प्रश्न विचारायला हवा की,मी ज्या गुणांचा नवरा शोधते,ते गुण माझ्यात कितपत आहेत...??आणि मुलांनीही स्वतःला विचारायला हवं की,मी ज्या मुलीची अपेक्षा करतो,तिच्या अपेक्षांना मी पात्र आहे का..??कारण नातं हे "खरेदी-विक्री"चा व्यवहार नसतो.तर तो दोन माणसांनी एकमेकांच्या सुख-दुःखात उभ राहण्याचा करार असतो.
आजच्या काळात एक विचित्र गोष्ट दिसते."बॉय-फ्रेंड" शोधताना आपण हसणारा चेहरा पाहतो,पण नवरा शोधताना "बँक बॅलन्स,गाडी, बंगला,शेती पाहतो.प्रेमात स्वभावा पेक्षा आकर्षण महत्त्वाचं वाटतं,तर लग्नात माणसा पेक्षा त्याची परिस्थिती.मग नंतर तक्रार केली जाते की चांगले लोक मिळत नाहीत.खरं तर चांगले लोक आजही आहेत,पण त्यांच्या कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे.
ज्याच्या कडे महागडी गाडी नाही,पण मन मोठं आहे,तो अनेकदा दुर्लक्षित राहतो.ज्याच्या कडे स्वतःचं घर नाही,पण जबाबदारीची जाणीव आहे,त्याला संधी मिळत नाही.आणि मग वर्षानुवर्षे "योग्य व्यक्ती" शोधण्याचा प्रवास सुरूच राहतो.शेवटी एकच सांगावंसं वाटतं."बॉय-फ्रेंड" मिळवणं सोपं असतं,कारण तिथे स्वप्नं विकली जातात.नवरा मिळवणं कठीण वाटतं,कारण तिथे आयुष्य जगायचं असतं.स्वप्नां मध्ये चुका चालतात,पण संसारात वास्तव स्वीकारावं लागतं.म्हणून चांगला नवरा शोधण्या पेक्षा चांगला माणूस ओळखायला शिका.कारण सुखी संसार चेहऱ्याने,पगाराने किंवा गाडीने टिकत नाही.तो विश्वास, स्वभाव,समजूतदार पणा आणि परस्पर आदराने टिकतो.आणि म्हणूनच प्रश्न "चांगला नवरा कुठे मिळेल हा नसून,"चांगला माणूस ओळखण्याची आपली नजर किती चांगली आहे..??हा असायला हवा.हाच प्रश्न समजला,तर कदाचित नवरदेव शोधण्याची समस्या आपोआप सुटेल.
सौ. हर्षा सचितानंदजी पाटील
कार्याध्यक्ष
(महिला मंच)
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ (अमरावती)