क्रीडा ई-प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू, - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, July 16, 2026

क्रीडा ई-प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू,

 घरबसल्या मिळणार डिजिटल प्रमाणपत्र


अमरावती, दि. १७ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र राज्यातील गुणवंत खेळाडूंना शासकीय आणि निमशासकीय सेवांमध्ये 5 टक्के आरक्षणाचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद गतीने मिळावा यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने 'क्रीडा ई-प्रमाण' ही ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत प्रणाली कार्यान्वित केली आहे. ही नवीन प्रणाली ब्लॉकचेन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असल्याने बोगस प्रमाणपत्रांना पूर्णपणे आळा बसेल, तसेच माहिती जुळल्यास अवघ्या 24 तासांच्या आत डिजिटल पडताळणी अहवाल खेळाडूंना उपलब्ध होणार आहे.

            विशेष म्हणजे आगामी काळातील महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसेच इतर सर्व शासकीय पदभरतीसाठी अर्ज करताना खेळाडूंना आता या क्रीडा ई-प्रमाणपत्राची प्रत जोडणे अनिवार्य करण्यात आले असून, या प्रमाणपत्राशिवाय खेळाडू संवर्गातून अर्जाचा विचार केला जाणार नाही. ज्या खेळाडूंनी यापूर्वी विभागीय उपसंचालकांकडून प्रमाणपत्रांची पडताळणी करून घेतली आहे, त्यांनाही यापुढे नवीन भरतीसाठी या प्रणालीद्वारे नवीन प्रमाणपत्र तयार करून घेणे बंधनकारक आहे.

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी पात्र खेळाडूंनी क्रीडा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला (https://sports.maharashtra.gov.in/) भेट देऊन 'आमच्या सेवा' (Our Services) मधील '5% Reservation' या टॅबमध्ये जाऊन आपली एक वेळ नोंदणी (One-Time Registration) पूर्ण करावी. नोंदणीसाठी खेळाडूंनी आपला आधार-संलग्न मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी, आधार कार्डची पीडीएफ आणि क्रीडा स्पर्धेत प्राप्त प्राविण्य प्रमाणपत्राची पीडीएफ फाईल तयार ठेवावी. सध्या कबड्डी, फेन्सिंग, ट्रायथलॉन (2025 ची स्पर्धा), ज्युडो (2024 ची स्पर्धा) आणि कुराश (2017-18 व 2024-25) या खेळांचे अभिलेख ऑनलाईन उपलब्ध असून याच खेळाडूंचे अर्ज स्वीकारले जात आहेत. तर इतर खेळांच्या खेळाडूंनी केवळ नोंदणी करून ठेवावी, त्यांचे अभिलेख अपलोड करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. तांत्रिक अडचणींमुळे ज्या खेळाडूंची माहिती किंवा प्रमाणपत्रे प्रणालीवर दिसत नसतील, त्यांनी आवश्यक तपशीलासह support@kridaepramaan.org या ई-मेलवर आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन क्रीडा विभागाकडून करण्यात आले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages