अमरावती, दि. १५ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात दिलेले शासकीय कर्तव्य पार पाडण्यात जाणीवपूर्वक निष्काळजीपणा व हलगर्जीपणा केल्याप्रकरणी चोपन येथील मतदान केंद्र स्तरीय अधिकारी सुनील नारायण काळे यांच्याविरुद्ध धारणी पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक आयोगाच्या कालबद्ध अशा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदारांना गणना पत्रकांचे वाटप करून ते परिपूर्ण भरून घेत त्यांचे संगणकीकरण करण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी संबंधित बी.एल.ओ. यांच्यावर सोपवण्यात आली होती. चोपन गावाचे बी.एल.ओ. म्हणून कार्यरत असलेले सहायक शिक्षक सुनील नारायण काळे यांनी या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या शासकीय कामात वारंवार हलगर्जीपणा व दुर्लक्ष केले. त्यांच्याकडून केवळ एक टक्क्यापेक्षा कमी गणना पत्रकांचे वाटप झाले असून एकही पत्रक संगणकीकृत करण्यात आले नव्हते.
पर्यवेक्षक तथा जलसंधारण अधिकारी जयंत रमेशपंत शिरभाते यांनी या कामाचा दैनंदिन आढावा घेताना ही गंभीर अनियमितता लक्षात आली. सुनील काळे यांनी पर्यवेक्षकांच्या सूचनांचे पालन न करणे, फोन व व्हॉट्सॲप संदेशांना प्रतिसाद न देणे आणि शासकीय दस्तऐवज अनाधिकृतरित्या स्वतःच्या ताब्यात ठेवल्याचे समोर आले. या प्रकरणी मतदार नोंदणी अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार धारणी यांच्यामार्फत बजावण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटीसलाही कोणतेही उत्तर दिले नाही.
निवडणूक कार्यात जाणीवपूर्वक खोळंबा निर्माण केल्याने, मतदार नोंदणी अधिकारी मेळघाट यांच्या आदेशान्वये पर्यवेक्षक जयंत शिरभाते यांनी धारणी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलीस निरीक्षक अवतारसिंग ठाकूरसिंग चव्हाण यांनी सुनील नारायण काळे यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 चे कलम 32, लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 चे कलम 134 आणि भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 223 अन्वये गुन्हा नोंद केला असून, पुढील तपास पोलीस ठाणे धारणीतर्फे करण्यात येत आहे.