मुलाखत :- "राजकारण हे सत्ता मिळवण्यासाठी नसून समाजसेवेचे प्रभावी माध्यम" – माजी सभापती श्री. तात्यासाहेब मेश्राम - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, July 14, 2026

मुलाखत :- "राजकारण हे सत्ता मिळवण्यासाठी नसून समाजसेवेचे प्रभावी माध्यम" – माजी सभापती श्री. तात्यासाहेब मेश्राम

                                                                           

                                          ग्रेट भेट : विशेष  मुलाखत :- ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क  
             

अमरावती जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती श्री. तात्यासाहेब मेश्राम यांची 'ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क ' वृत्तवाहिनीने घेतलेली ही सविस्तर मुलाखत आहे. या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी 'राजकारण हे समाजसेवेचे प्रभावी माध्यम' असल्याचे सांगत आपले राजकीय विचार आणि अमरावती जिल्ह्यातील विविध सामाजिक प्रश्नांवर सविस्तर प्रकाश टाकला आहे.

तात्यासाहेब मेश्राम यांचा थोडक्यात परिचय व कार्यक्षेत्र:
                                                        नाव: श्री. तात्यासाहेब मेश्राम
पद: माजी समाजकल्याण सभापती, जिल्हा परिषद अमरावती.
पक्ष: भारतीय जनता पक्ष (BJP).
प्रमुख कार्यक्षेत्रे: दलित वस्ती सुधारणा, अपंग कल्याण, दर्जेदार शिक्षण व आरोग्य, रमाई घरकुल योजना, ग्रामीण विकास.

विशेष कार्ये :- दलित वस्त्यांना स्वतंत्र निधीची तरतूद, रमाई घरकुल योजना आराखडा, विविध कल्याणकारी योजनांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा

दि. १५ अमरावती:
"माझ्यासाठी राजकारण म्हणजे केवळ सत्ता किंवा पद मिळवणे नसून, समाजातील तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचून त्यांची सेवा करण्याचे ते एक प्रभावी माध्यम आहे," असे प्रतिपादन अमरावती जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती आणि भारतीय जनता पक्षाचे (BJP) सक्रिय नेते श्री. तात्यासाहेब मेश्राम यांनी केले. 'ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क' या वृत्तवाहिनीने घेतलेल्या एका विशेष मुलाखतीत ते बोलत होते.
 राजकीय प्रवासाची सुरुवात
तात्यासाहेब मेश्राम यांनी सांगितले की, त्यांना लहानपणापासूनच समाजकारणाची आवड आणि जिद्द होती. ग्रामपंचायत, पंचायत समिती ते जिल्हा परिषद असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. सुरुवातीच्या काळात त्यांनी रस्ते, विहिरी आणि शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी आंदोलन व संघर्ष केला.
समाजकल्याण सभापती पदाच्या काळातील उल्लेखनीय कामे
२००७ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीवर जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर, त्यांनी दलित वस्ती सुधार योजना अत्यंत प्रभावीपणे राबवली.
 दिव्यांग आणि अपंग व्यक्तींना घरपोच साहित्याचे वाटप केले.
 रमाई घरकुल योजना आणि घरकुल योजनेच्या मंजुरीसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून गरजू कुटुंबांना हक्काची घरे मिळवून दिली.
 भारतीय जनता पक्षात प्रवेशाचे कारण
माजी आमदार साहेबराव तट्टे सर यांच्या कामाच्या पद्धतीमुळे आणि त्यांच्या विचारांमुळे प्रभावित होऊन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कार्यकर्त्यांना सोबत घेऊन, माणसांना जोडण्याचे आणि विकासाभिमुख काम करण्याचे स्वातंत्र्य भाजपमध्ये मिळाल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला.
 पूर्वीच्या आणि आजच्या राजकारणातील काय फरक जाणवतो 
मेश्राम यांनी आजच्या बदलत्या राजकारणावर चिंता व्यक्त केली. पूर्वीच्या राजकारणात तत्त्वनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि समाजहिताला प्राधान्य होते. मात्र, आजच्या वैचारिक राजकारणापेक्षा व्यक्तिद्वेष आणि स्वार्थाचे राजकारण वाढले असून, निष्ठावान कार्यकर्त्यांचा सन्मान कमी होत असल्याचे त्यांनी प्रांजळपणे मान्य केले.
 आरोग्य व शिक्षणाची स्थिती
त्यांच्या मते, जिल्ह्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागात अजूनही आरोग्य आणि शिक्षणाच्या क्षेत्रात मोठे काम करणे बाकी आहे. प्रत्येक नागरिकाला मोफत आणि दर्जेदार आरोग्य सुविधा तसेच शिक्षण मिळायला हवे. आणि आरोग्य क्षेत्रात काही चांगल्या योजना आल्या असल्या तरी शिक्षणाच्या बाबतीत अधिक व्यापक धोरणांची गरज आहे.
 यासाठी कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत?
लोकशाहीतील सरकारने नागरिकांच्या मूलभूत गरजांना सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. रोजगारनिर्मिती, औद्योगिक विकास, दर्जेदार शिक्षण, नदीजोड प्रकल्प, ग्रामीण भागात सुसज्ज रुग्णालये आणि शेतीला बळकटी देणाऱ्या योजना राबविल्या तर सर्वसामान्यांचा विकास शक्य आहे.
 राजकारणातून समाजकारण शक्य आहे का?
नक्कीच शक्य आहे. मात्र त्यासाठी जनसेवेची प्रामाणिक भावना असावी लागते. राजकारण हे सत्ता मिळविण्याचे नव्हे, तर समाजाला दिशा देण्याचे माध्यम आहे.
अमरावती जिल्ह्यातील प्रमुख समस्या
अमरावती जिल्ह्यातील मुख्य समस्यांवर बोट ठेवत त्यांनी खालील मुद्द्यांकडे लक्ष वेधले:
  • खासगी रुग्णालयांमध्ये वाढलेला उपचाराचा खर्च.
  • मेळघाटातील कुपोषण.
  • शेतीतील गंभीर संकट आणि बनावट बियाणांचा सुळसुळाट.
  • वाढती बेरोजगारी आणि शिक्षण क्षेत्रातील व्यापारीकरण.
  • शेतमालाला योग्य भाव न मिळणे.
  • औद्योगिक वसाहतींचा (MIDC) अपूर्ण विकास.
    या सर्व समस्यांवर केंद्र व राज्य सरकारने ठोस धोरणे राबवण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 शेतकरी कर्जमाफी आणि निवडणुकांचा विलंब
नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी सातत्याने आर्थिक अडचणीत येतो, त्यामुळे सरसकट शेतकरी कर्जमाफी अत्यंत आवश्यक आहे.मात्र पात्र असलेल्या कोणत्याही लहान शेतकऱ्याला केवळ निकषांमुळे वंचित राहावे लागू नये, ही माझी अपेक्षा आहे.
 जिल्हा परिषद निवडणुकांना विलंब का होत आहे ? 
आरक्षणा संदर्भातील न्यायालयीन प्रक्रियेमुळे जिल्हा परिषद निवडणुकांना विलंब होत आहे. हा तांत्रिक विषय असला तरी लोकशाहीच्या दृष्टीने निवडणुका लवकर होणे गरजेचे आहे.

प्रेरणादायी विचार - 
"जोपर्यंत समाजातील शेवटच्या माणसाच्या चेहऱ्यावर सुखाचे हसू येत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने विकास झाला असे म्हणता येणार नाही."

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages