अमरावती, दि.02 (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर, अमरावती आणि पोलीस अधीक्षक कार्यालय (ग्रामीण) यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा कौशल्य विकास केंद्रात नुकताच 'मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षणार्थी निवड मेळावा' संपन्न झाला. पोलीस अधीक्षक कार्यालय अमरावती ग्रामीण येथील 105 रिक्त जागांसाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी तब्बल 790 उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने प्रत्यक्ष उपस्थित राहून मुलाखती दिल्या, ज्यामधून 264 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.
या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे उद्घाटन पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या हस्ते झाले. यावेळी उपायुक्त दत्तात्रय ठाकरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड, सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर, कौशल्य विकास मार्गदर्शन अधिकारी अभिषेक ठाकरे, कनिष्ठ मार्गदर्शन अधिकारी सुभाष गुल्हाने, संदीप यादव उपस्थित होते.
यावेळी पोलीस अधीक्षक निकेतन कदम म्हणाले की, पोलीस विभागाच्या शिस्तीसोबतच 'पोलीस मित्र' म्हणून प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण घेण्याची संधी आहे. तरुणांनी या संधीचे सोने करून समाजात पोलीस विभागाची प्रतिमा सन्मानाने उंच करावी. तसेच उपायुक्त दत्तात्रय ठाकरे यांनी, या प्रशिक्षणातून मिळणारे शिस्तीचे धडे आत्मसात करून आपल्या जीवनात त्याचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. अत्यंत महत्त्वाच्या विभागासोबत काम करण्याची ही संधी आनंदाने स्वीकारावी, असे प्रांजली बारस्कर यांनी प्रास्ताविकात सांगितले. कार्यक्रमाचे संचालन संपदा डाखरे यांनी तर आभार पंकज कचरे यांनी मानले.