अमरावती, दि. ०२ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या व्यापक प्रसिद्धीसाठी अमरावती राज्यसेवा हक्क आयुक्त कार्यालयाने तयार केलेल्या विशेष माहिती पुस्तिकेचे काल महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या कार्यालयात विमोचन करण्यात आले. मुख्य राज्यसेवा हक्क आयुक्त मनू कुमार श्रीवास्तव यांच्या हस्ते या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
या सोहळ्याला राज्यसेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग, चित्रा कुलकर्णी, संदीप देशमुख,श्री. शिंदे तसेच आयोगाच्या सचिव श्रीमती वैशाली चव्हाण व इतर वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अरुण डोंगरे यांनी प्रास्ताविक करून पुस्तिकेच्या निर्मितीमागील उद्देश स्पष्ट केला. तर कार्यक्रमाच्या शेवटी अमरावती राज्य सेवा हक्क कार्यालयाचे उपसचिव देवेंद्र चव्हाण यांनी मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव, सर्व आयुक्त, विशेष कार्य अधिकारी श्री. शिंदे आणि सचिव श्रीमती चव्हाण यांच्यासह उपस्थित सर्वांचे आभार मानले. नागरिकांना शासकीय सेवा वेळेत व पारदर्शकपणे मिळवून देण्यासाठी ही माहिती पुस्तिका अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.