फळपीक विमा योजना 2026: संत्रा, मोसंबी, लिंबू आणि सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांना मुदतवाढ - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, July 3, 2026

फळपीक विमा योजना 2026: संत्रा, मोसंबी, लिंबू आणि सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांना मुदतवाढ


 कृषी विभागाचे आवाहन

अमरावती, दि.०३(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): राज्य शासनाने पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना सन 2026-27 (मृग बहार) अंतर्गत अमरावती जिल्ह्यात संत्रा, मोसंबी, लिंबू आणि सीताफळ या प्रमुख फळपिकांसाठी विमा उतरवण्यास मंजुरी दिली असून, शेतकऱ्यांना यात सहभागी होण्यासाठी मुदतवाढ जाहीर केली आहे. नवीन वेळापत्रकानुसार, लिंबू, संत्रा व मोसंबी या फळपिकांसाठी विमा भरण्याची अंतिम मुदत 14 जुलै 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तर सीताफळ पिकासाठी शेतकऱ्यांना 31 जुलै 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहे. प्रतिकूल हवामानामुळे  फळबागांचे होणारे आर्थिक नुकसान टाळून शेतकऱ्यांना स्थैर्य देणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे 'अॅग्रीस्टॅक' अंतर्गत शेतकरी ओळखपत्र असणे आणि 'ई-पिक पाहणी' पोर्टलवर पिकाची नोंद असणे अनिवार्य करण्यात आले आहे. नोंदणीत विसंगती आढळल्यास अर्ज रद्द होऊ शकतो. केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच (संत्री, मोसंबी व सीताफळसाठी किमान वय 3 वर्षे आणि लिंबूसाठी 4 वर्षे) हे विमा संरक्षण कवच मिळेल. प्रति शेतकरी किमान 20 गुंठे ते कमाल 4 हेक्टरपर्यंत क्षेत्राची मर्यादा निश्चित आहे.

विमा संरक्षणाचा विचार करता, संत्रा व मोसंबीसाठी प्रति हेक्टर 1 लाख रुपये (शेतकरी हिस्सा 5 हजार रुपये), लिंबूसाठी 80 हजार रुपये (शेतकरी हिस्सा ४ हजार रुपये) आणि सीताफळासाठी 70 हजार रुपये (शेतकरी हिस्सा 3 हजार 500 रुपये) विमा हप्ता निश्चित केला आहे.

अमरावती जिल्ह्यात 'इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी'मार्फत ही योजना राबविली जात आहे. हवामानाचा धोका उद्भवल्यास नुकसान भरपाई थेट आधार लिंक बँक खात्यात जमा होईल. तरी जिल्ह्यातील सर्व कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी जवळच्या बँक शाखेत किंवा 'आपले सरकार सेवा केंद्रात' जाऊन विहित मुदतीत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले  केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages