जिल्हा कोषागार कार्यालय येथे नवीन सेवार्थ प्रणालीबाबत प्रशिक्षण शिबिर संपन्न - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, July 3, 2026

जिल्हा कोषागार कार्यालय येथे नवीन सेवार्थ प्रणालीबाबत प्रशिक्षण शिबिर संपन्न

 


अमरावती, दि.०३ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क):  शासनाच्या डिजिटल कार्यप्रणालीला अधिक सक्षम, पारदर्शक आणि कार्यक्षम बनविण्याच्या उद्देशाने जिल्हा कोषागार कार्यालय, अमरावती तर्फे ‘नवीन सेवार्थ प्रणाली (ई-वेतन) कामकाज मार्गदर्शिका’ या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर जिजाऊ सभागृह येथे नुकतेच संपन्न झाले. या शिबिरामध्ये अमरावती शहरासह चांदूर रेल्वे, चांदूरबाजार, मोर्शी, वरुड, तिवसा, धामणगाव व नांदगाव या उपकोषागार कार्यालयांतर्गत येणारे आहरण व संवितरण अधिकारी सहभागी होते. यावेळी वरिष्ठ कोषागार अधिकारी विजय जवंजाळ,  अप्पर कोषागार अधिकारी  जयश्री उताणे, कोषागार अधिकारी अमोल इथापे आदी उपस्थित होते.

जयश्री उताणे यांनी प्रास्ताविकातून डिजिटल कार्यप्रणालीचे महत्त्व आणि शिबिराचा उद्देश स्पष्ट केला. कोषागार अधिकारी श्री.  इथापे यांनी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली  आणि 'ग्रास'  या प्रणालींच्या कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन करताना कामकाजात पारदर्शकता आणण्याचे आवाहन केले.  विजय जवंजाळ यांनी नवीन प्रणालीमध्ये 'डेटा मायग्रेशन' करताना घ्यावयाची काळजी, माहितीची अचूकता आणि त्रुटी टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी यावर भर दिला. डेटा मायग्रेशन ही प्रणालीच्या यशाची गुरुकिल्ली असून ती काळजीपूर्वक पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी केले.

प्रशिक्षक  पवन पचाजे, व नमिता हांडे यांनी सेवार्थ प्रणालीतील विविध मॉड्युल्स, कर्मचारी माहिती अद्ययावतीकरण आणि ई-वेतन प्रक्रियेचे प्रत्यक्ष सादरीकरण केले. त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. उपस्थितांनी या डिजिटल उपक्रमाचे स्वागत करत, हे प्रशिक्षण प्रत्यक्ष कामकाजासाठी उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages