अचलपूर येथे 6 जुलै रोजी 'नवीन सेवार्थ प्रणाली' प्रशिक्षणाचे आयोजन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, July 3, 2026

अचलपूर येथे 6 जुलै रोजी 'नवीन सेवार्थ प्रणाली' प्रशिक्षणाचे आयोजन

अमरावती, दि. ०३ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): शासनाच्या नवीन सेवार्थ प्रणालीची जिल्ह्यात प्रभावी, पारदर्शक आणि सुरळीत अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने जिल्हा कोषागार कार्यालय, अमरावती यांच्या वतीने दुसऱ्या टप्प्यातील विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण सोमवार, दिनांक ६ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नवीन प्रशासकीय इमारत, उपविभागीय कार्यालय, अचलपूर येथे आयोजित करण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण प्रशिक्षणासाठी अचलपूर, दर्यापूर, चिखलदरा, धारणी आणि अंजनगाव सुर्जी या पाच तालुक्यांतील सर्व आहरण व संवितरण अधिकारी तसेच संबंधित कार्यालयांतील सेवार्थ प्रणाली हाताळणारे अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये नवीन सेवार्थ प्रणालीची नेमकी कार्यपद्धती, वेतन देयके अचूकपणे तयार करण्याची प्रक्रिया, प्रणालीतील विविध मॉड्यूल्सचा वापर, आवश्यक दुरुस्त्या आणि नवीन तांत्रिक बदलांविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय, एनपीएस वेळेत जमा करण्याची पद्धत आणि 'ग्रास' प्रणालीचा वापर करून शासकीय खात्यात महसूल भरण्याची प्रक्रिया याविषयी प्रत्यक्ष उदाहरणांसह माहिती दिली जाईल. शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन व लेखाविषयक कामात सुसूत्रता आणि गतिशीलता आणण्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वाचे ठरणार असून, यात उपस्थित कर्मचाऱ्यांच्या शंकांचे निरसन केले जाणार आहे. तरी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विहित वेळेत उपस्थित राहून या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयाने केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages