जिल्ह्यातील तरुणांसाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, June 26, 2026

जिल्ह्यातील तरुणांसाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण

 


जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची क्लिनिकल रिसर्च बॅचला भेट

अमरावती, दि.26 (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातील युवा वर्गाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या उद्देशाने, किमान कौशल्य विकास योजनेअंतर्गत रेडिअंट हॉस्पिटल येथे 'क्लिनिकल रिसर्च असोसिएट' या कोर्सचे मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षण बॅचला आज जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला .

या प्रसंगी प्रशिक्षणार्थी तृप्ती मोहकर व शरण्य पांडव यांनी जिल्हा प्रशासनाचे आभार मानत हे प्रशिक्षण करिअरसाठी उपयुक्त ठरेल, याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. हॉस्पिटलच्या प्रशिक्षण संचालिका डॉ. माधुरी अग्रवाल यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हा कोर्स 2025-26 या आर्थिक वर्षात उपलब्ध झाला असून, मागील वर्षी 60 पैकी 40 विद्यार्थ्यांना लखनऊ, हैदराबाद, दिल्ली यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये रोजगार मिळाला आहे. हा कोर्स औषधे, जैविक उत्पादने आणि वैद्यकीय उपकरणांच्या आंतरराष्ट्रीय नियमांचे सर्वसमावेशक ज्ञान देतो.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. येरेकर म्हणाले, क्लिनिकल रिसर्च हे वैद्यकीय क्षेत्रातील झपाट्याने विस्तारणारे क्षेत्र आहे. हे प्रशिक्षण भारतात खूप महागडे आहे, परंतु आपल्या जिल्ह्यातील युवकांसाठी ते शासनामार्फत मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासोबतच जिल्ह्यात किसान ड्रोन ऑपरेटर, एआय, सायबर सिक्युरिटी, डिजिटल मार्केटिंग, सोलर पॅनल व सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन यांसारखे आधुनिक कोर्सेसही मोफत उपलब्ध आहेत. गरजू तरुणांनी या संधीचा लाभ घेऊन स्वावलंबी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

या प्रशिक्षणाबाबत अधिक माहिती व नोंदणीसाठी इच्छुकांनी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा उस्मानिया मशिदीजवळ, टेक्निकल हायस्कूल परिसरातील जिल्हा कौशल्य विकास कार्यालयाशी संपर्क साधावा. या भेटीदरम्यान सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर , डॉ. काकाणी, डॉ. पवन अग्रवाल आदी उपस्थित होते.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages