सफाई कामगार यांना सुविधा किमान वेतन मिळण्यासाठी निवेदन .. - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, June 26, 2026

सफाई कामगार यांना सुविधा किमान वेतन मिळण्यासाठी निवेदन ..

 




 प्रति,

मा. वर्षा लढ्ढा  (भा.प्र.से.)

आयुक्त

अमरावती महानगर पालिका अमरावती

विषय : अमरावती महानगरपालिकेअंतर्गत कार्यरत कंत्राटी सफाई कामगार व वाहन चालकांना किमान वेतन, सामाजिक सुरक्षा,सुरक्षित कार्यपरिसर व कामगार हक्कांची अंमलबजावणी करण्याबाबत, तसेच पावसाळ्यापूर्वी  रेनकोट,रबरी बूट इतर सुरक्षा साधने मिळण्याबाबत निवेदन.

महोदय,

                     अमरावती महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी सफाई कामगार व वाहन चालकांची परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून त्यांच्या मूलभूत कामगार हक्कांचे उल्लंघन होत असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. उपलब्ध माहितीनुसार, सफाई कामगारांना सुमारे रु. १२,४००/- व वाहन चालकांना सुमारे रु. १३,४००/- इतके मासिक वेतन दिले जात आहे. हे वेतन शासनाने निश्चित केलेल्या किमान वेतन दरांनुसार आहे की नाही, याबाबत कामगारांमध्ये संभ्रम असून त्याची स्वतंत्र चौकशी होणे अत्यावश्यक आहे. तसेच, कामगारांच्या वेतनातून भविष्य निर्वाह निधी (PF) कपात केली जात असल्याचे सांगितले जाते; मात्र PF खात्यात जमा होणाऱ्या रकमेचा तपशील, UAN क्रमांक, पासबुक माहिती व संबंधित कागदपत्रे अनेक कामगारांना उपलब्ध करून दिली जात नसल्याची तक्रार आहे. कामगारांना मंजूर साप्ताहिक सुट्ट्या असूनही विविध कारणांनी वेतन कपात केली जात असल्याचे निदर्शनास येते. तसेच अधिकारी, पर्यवेक्षक व कंत्राटदार कंपनीकडून कामगारांवर अनावश्यक कामाचा व मानसिक दबाव टाकला जात आहे. काही कामगारांच्या म्हणण्यानुसार, हक्कांसाठी आवाज उठवल्यास त्यांना दमदाटी, शिवीगाळ व त्रास दिला जातो, ज्यामुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरक्षेच्या दृष्टीनेही गंभीर त्रुटी आढळून येत आहेत. अनेक कामगारांना हातमोजे, गमबूट, मास्क, रेनकोट, टोपी, प्रतिबिंबित जॅकेट इत्यादी आवश्यक सुरक्षा साहित्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही. परिणामी, ते अत्यंत धोकादायक व अस्वच्छ परिस्थितीत काम करण्यास बाध्य होत आहेत.  याशिवाय, नियमित आरोग्य तपासणी, विमा संरक्षण व वैद्यकीय सुविधा यांचाही अभाव दिसून येतो. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अहोरात्र परिश्रम करणाऱ्या या कामगारांना किमान वेतन, सुरक्षित साधने, सामाजिक सुरक्षा, पारदर्शक PF हिशोब व सन्मानजनक वागणूक मिळणे हा त्यांचा संविधानिक व कायदेशीर अधिकार आहे.

म्हणून आपणास नम्र विनंती आहे की :

१. अमरावती महानगरपालिकेअंतर्गत कार्यरत सर्व कंत्राटी सफाई कामगार व वाहन चालकांच्या वेतनाची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी व प्रभागनिहाय दूरध्वनी क्रमांकासह यादी प्रसिद्ध करण्यात यावी.

२. शासनाने निश्चित केलेले किमान वेतन तात्काळ लागू करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी.

३. PF, ESI व इतर कायदेशीर लाभांची तपासणी करून त्याचा संपूर्ण तपशील कामगारांना उपलब्ध करून देण्यात यावा.

४. सर्व कामगारांना आवश्यक सुरक्षा साहित्य नियमितपणे पुरविण्याचे आदेश देण्यात यावेत, तसेच पावसाळ्यापूर्वी  रेनकोट,रबरी बूट इतर सुरक्षा साधने मिळण्याबाबत,

५. कामगारांची नियमित आरोग्य तपासणी व विमा संरक्षणाची व्यवस्था करण्यात यावी.

६. वेतन कपात, कामाचा दबाव व कामगारांवरील अन्यायाच्या तक्रारींची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी.

७. कामगारांना संघटनात्मक व लोकशाही अधिकारांचा वापर करण्यासाठी सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यात यावे.

८. संबंधित कंत्राटदार कंपनीच्या कार्यपद्धतीची चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करण्यात यावी व कंत्राटदाराशी झालेला करारनामा मराठीत प्रसिद्ध करण्यात यावा.

९. वरील सर्व बाबींवर आमचे म्हणणे मांडण्यासाठी आम्हाला भेटीसाठी वेळ देण्यात यावा.

                  अमरावती शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणाऱ्या व महानगरपालिकेचे कर भरणारे नागरिक असलेल्या या कामगारांना न्याय, सुरक्षा व सन्मान मिळवून देणे ही शासनाची मुख्य जबाबदारी आहे. ती आपण पूर्ण कराल, ही अपेक्षा.

धन्यवाद.

 

                                                                                                                                              आपला विश्वासू,

                                                                                                                                                 सागर दुर्योधन

                                                                                                 राज्य सचिव, अखिल भारतीय नौजवान सभा, महाराष्ट्र

                                                                                                  पत्ता : वैशाली वाघ, अनुश्री जनरल स्टोअर्स जवळ,

                                                                                                       हनुमान मंदिराजवळ, महात्मा फुले नगर, नवसारी,

                                                                                                            पो. व्ही.एम.व्ही., अमरावती – ४४४६०४

                                                                                                       मो. नं. : ९६६५१८५४२८ / ७४९९३९०५२३

 

प्रतिलिपी

१. मा. खासदार, अमरावती लोकसभा.

२. मा. ना. पालकमंत्री, अमरावती जिल्हा

३. मा. आमदार, सुलभाताई खोडके, अमरावती विधानसभा

४. मा. आमदार, रवीभाऊ राणा, बडनेरा विधानसभा

५. मा. आयुक्त म.न.पा. अमरावती

६. मा. जिल्हाधिकारी, अमरावती

७. सहाय्यक कामगार आयुक्त, अमरावती. 

८. मा. महापौर मनपा अमरावती.


 वरील निवेदन  मा मुख्यमंत्री व मा आयुक्त यांना दिले आहे तरी सदर निवेदन आपल्या वृत्तपत्र मधून प्रकाशित करून सफाई कामगार याना न्याय मिळण्यासाठी मदत करावी हि नम्र विनंती .

आपला सागर दुर्योधन 

९६६५१८५४२८ 



Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages