शिरसगाव कसब्यात खळबळ: शीतला माता मंदिरातील दोन्ही दानपेट्यांसह मातेचे दागिने लंपास - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, June 5, 2026

शिरसगाव कसब्यात खळबळ: शीतला माता मंदिरातील दोन्ही दानपेट्यांसह मातेचे दागिने लंपास



 मंदिरे चोरट्यांच्या निशाण्यावर!
दि. ५ शिरसगाव कसबा:
शिरसगाव कसबा येथील प्रसिद्ध आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शीतला माता मंदिरात मध्यरात्रीच्या सुमारास धाडसी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी मंदिराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि मंदिरातील दोन्ही दानपेट्या फोडून त्यातील रोकड लंपास केली. एवढेच नव्हे तर, गाभाऱ्यातील मातेच्या मूर्तीसमोरील काच फोडून मूर्तीवरील मौल्यवान आभूषणे आणि दागिनेही चोरून चोरटे अंधाराचा फायदा घेत पसार झाले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप आणि खळबळ उडाली आहे. 
सकाळी  स्थानिक नागरिक मंदिरात आले, तेव्हा त्यांना मुख्य दरवाजा उघडा दिसला. आत जाऊन पाहिले असता दानपेट्या फुटलेल्या आणि मातेचे दागिने गायब असल्याचे दिसून आले. नागरिकांनी तातडीने या घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला दिली. 
 काही दिवसांपूर्वीच खुदानपूर येथील मारुती मंदिरही फोडले!
शिरसगाव कसबा आणि आसपासच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून धार्मिक स्थळांना लक्ष्य केले जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वीच खुदानपूर येथील मारुती मंदिरातील दानपेटी देखील अज्ञात चोरट्यांनी अशाच प्रकारे फोडल्याची घटना घडली होती. त्या घटनेचा तपास अद्याप सुरू असतानाच, आता थेट शीतला माता मंदिरावर दरोडा टाकल्याने चोरट्यांचे धाडस कमालीचे वाढल्याचे चित्र दिसत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे.
परिसरात सातत्याने होणाऱ्या या चोरीच्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त  वाढवावी आणि या दोन्ही मंदिरांतील चोऱ्या करणाऱ्या टोळीचा तात्काळ छडा लावून त्यांना कडक शिक्षा करावी, अशी आग्रही मागणी शिरसगाव कसबा आणि खुदानपूर येथील नागरिकांकडून केली जात आहे.
तसेच गावातील व परिसरातील मंदिर व्यवस्थापकांनी सुरक्षतेच्या दुष्टीने काळजी घ्यावी.त्याप्रमाणे उपाययोजना कराव्यात.पोलीस विभागावर अवलंबून राहू नये.



Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages