१९६२ हेल्पलाइन व व्हॉट्सॲप चॅटबॉटमुळे पशुवैद्यकीय सेवा घरपोच - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, June 2, 2026

१९६२ हेल्पलाइन व व्हॉट्सॲप चॅटबॉटमुळे पशुवैद्यकीय सेवा घरपोच

 


पशुपालकांनीलाभ घेण्याचे विभागाव्दारे आवाहन 

·         ८ लाखांहून अधिक जनावरांवर उपचार ; शेतकऱ्यांसाठी डिजिटल सुविधांचा विस्तार

                                                                                                                                                                                                                                                                                                                                                        

            अमरावती, दि. ०२ : राज्यातील पशुपालक आणि शेतकऱ्यांना तात्काळ व सुलभ पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा पशुसंवर्धन विभाग, भारत फायनान्शियल इंक्लुजन लिमिटेड (BFIL) आणि इंडसइंड बँकेच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणारी ‘१९६२ टोल-फ्री हेल्पलाइन’ प्रभावी ठरत आहे. गेल्या पाच वर्षांत या उपक्रमाद्वारे राज्यातील ८ लाखांहून अधिक जनावरांवर उपचार करण्यात आले असून ग्रामीण व दुर्गम भागातील पशुपालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पशुपालकांनी १९६२ हेल्पलाइन व व्हॉट्सॲप चॅटबॉट सेवेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

            मोबाईल व्हेटर्नरी युनिट्सच्या माध्यमातून पशुवैद्यकीय सेवा थेट शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचविण्यात येत आहेत. या उपक्रमाच्या यशानंतर सेवा अधिक गतिमान आणि डिजिटल करण्याच्या उद्देशाने व्हॉट्सॲप-आधारित चॅटबॉट सेवा सुरू करण्यात आली आहे.

            शेतकरी आणि पशुपालक +९१ ९०६३१४२२९९ या क्रमांकावर व्हॉट्सॲपवर "Hi" असा संदेश पाठवून किंवा क्यूआर कोड स्कॅन करून या सेवेचा लाभ घेऊ शकतात. या माध्यमातून पशुधनाचे आजार, उपचार, लसीकरण, पशुसंवर्धनविषयक माहिती तसेच विविध शासकीय योजनांची माहिती मिळते. तसेच चॅट, ऑडिओ कॉल आणि व्हिडिओ कॉलद्वारे पशुवैद्यकीय तज्ज्ञांशी थेट संवाद साधण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

            या चॅटबॉटमध्ये पशुवैद्यकीय टेलिकन्सल्टेशन, पशुवैद्यकीय रुग्णालयांची माहिती, सेवा निर्देशिका, शासकीय योजनांची माहिती आणि वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे यांचा समावेश करण्यात आला आहे.

            ऑक्टोबर २०२५ ते मे २०२६ या कालावधीत ६१५ शेतकऱ्यांनी चॅटबॉटचा वापर केला असून २०१ व्हिडिओ कन्सल्टेशन यशस्वीरित्या पार पडली आहेत. त्यामुळे पशुधनाच्या आरोग्याशी संबंधित समस्यांवर त्वरित मार्गदर्शन मिळत असून शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च दोन्हीची बचत होत आहे. राज्यातील पशुवैद्यकीय सेवा अधिक सक्षम, सुलभ आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे पशुसंवर्धन विभागाने सांगितले, असेही पशुसंवर्धन विभागाव्दारे सांगण्यात आले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages