अमरावती, दि. २० (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): जिल्ह्यामध्ये सन 2026-27 या वर्षात सोयाबीन पिकासाठी 'राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया योजना' राबविण्यात येत असून, या योजनेअंतर्गत जिल्ह्यात 'मिनी ऑईल मिल (एक्सपेलर)' या घटकाचे लक्षांक प्राप्त झाले आहेत. पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा जास्तीत-जास्त प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत मिनी ऑईल मिल, एक्सपेलर फिल्टर प्रेससह आणि मिनी ऑईल मिल, एक्सपेलर फिल्टर प्रेसशिवाय अशा दोन घटकांचा लाभ वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि मूल्य साखळी भागीदार गट यांना दिला जाणार आहे. कृषी यांत्रिकीकरण उपअभियानाच्या नियमांनुसारच लाभार्थ्यांची निवड केली जाईल आणि यासाठी महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांनी सादर केलेल्या अर्जांमधून प्राधान्याने या योजनेसाठी लाभार्थी निवडले जाणार आहेत. या अभियानांतर्गत आर्थिक मर्यादेचा तपशील पाहता, मिनी ऑईल मिल, एक्सपेलर फिल्टर प्रेससह या घटकासाठी ४ लाख रुपये प्रति युनिट खर्च मर्यादा असून, युनिटच्या किमतीच्या 50 टक्के किंवा निर्धारित उच्चतम मर्यादेत, अथवा युनिटच्या किमतीच्या 40 टक्के किंवा निर्धारित उच्चतम मर्यादेत अनुदान देय राहील; तर मिनी ऑईल मिल, एक्सपेलर फिल्टर प्रेसशिवाय या घटकासाठी 3 लाख रुपये प्रति युनिट खर्च मर्यादा असून, यामध्येही युनिटच्या किमतीच्या 50 टक्के किंवा निर्धारित उच्चतम मर्यादेत, अथवा युनिटच्या किमतीच्या 40 टक्के किंवा निर्धारित उच्चतम मर्यादेत अनुदान उपलब्ध करून दिले जाईल.
पात्रतेच्या निकषानुसार जिल्ह्यातील इच्छुक वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि मूल्य साखळी भागीदार गटांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत आणि या योजनेच्या अधिक माहितीसाठी व तांत्रिक तपशिलासाठी नागरिकांनी आपापल्या संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.