'स्वाधार' योजनेच्या लाभासाठी शासकीय वसतिगृहात प्रवेश अर्ज बंधनकारक - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, June 15, 2026

'स्वाधार' योजनेच्या लाभासाठी शासकीय वसतिगृहात प्रवेश अर्ज बंधनकारक


 समाज कल्याण विभागाचे विद्यार्थ्यांना आवाहन

 

अमरावती, दि १६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) :  शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ मिळवण्यासाठी प्रथम शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जे विद्यार्थी शासकीय वसतिगृहासाठी अर्ज करणार नाहीत त्यांना स्वाधार योजनेचा तसेच वसतिगृह योजनेचा लाभ मिळणार नाही, अशी माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त आर. व्ही. जाधवर यांनी दिली आहे.

 

 

            राज्यात व्यावसायिक व अव्यावसायिक महाविद्यालयांची आणि तेथे प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना शासकीय वसतिगृहातील जागांची मर्यादा लक्षात घेता सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश देणे शक्य होत नसल्याने, पात्र विद्यार्थ्यांच्या भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट बँक खात्यात आर्थिक रक्कम जमा करण्यासाठी शासनाने 'स्वाधार योजना' सुरू केली आहे. मात्र समाज कल्याण विभागाने आता या नियमात महत्त्वपूर्ण बदल केला आहे. या बदललेल्या नियमांनुसार इयत्ता ११ वी, १२ वी तसेच १२ वी नंतरच्या व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सर्व पात्र विद्यार्थ्यांनी प्रथम शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर १५  ते ३१ जुलै २०२६ या मुदतीत ऑनलाईन अर्ज भरणे बंधनकारक आहे. गुणवत्तेनुसार अथवा जागेअभावी ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही, तेच विद्यार्थी पुढील 'स्वाधार योजने’च्या लाभासाठी पात्र राहतील.

 

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी सर्व पात्र विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षात शासकीय वसतिगृहासाठी वेळेत अर्ज नोंदविण्याचे आवाहन केले असून अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी सामाजिक न्याय भवन, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, अमरावती (चांदूर रेल्वे रोड, सी.पी. ऑफिसच्या मागे, अमरावती) येथे किंवा speldswo_amt@rediffmail.com या ई-मेल आयडीवर तसेच 0721-2661261 या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages